तलवारीच्या धाकावर दहशत पसरवणाऱ्या युवकाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दहशत पसरविण्याचा उद्देशाने हातात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला वणी पोलिसांनी अटक केली. सदर कार्यवाही रविवार 11 जून रोजी मध्यरात्री वणी शहरातील नटराज चौक भागात करण्यात आली. सुमित देविदास राखुंडे (25) रा. नटराज चौक वणी असे तलवारीसह अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार रविवार 11 जून रोजी रात्री पोलिस उप निरीक्षक प्रवीण हिरे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरात सरकारी वाहनाने पेट्रोलिंग ड्यूटी करीत होते. दरम्यान नटराज चौक येथे एक युवक हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीवरुन पो.उप नि. प्रवीण हिरे सहकारी पोलिस कर्मचारी वसीम आणि श्रीनिवाससह नटराज चौक येथे गेले असता एक युवक हातात धारदार लोखंडी तलवार घेऊन धुमाकूळ घालत असताना दिसून पडला. पोलिस कर्मचाऱ्यांनी युवकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी यांनी पोलिसांवर तलवार भिरकावली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून आरोपी युवकास ताब्यात घेतले. तसेच आरोपीच्या कब्जातून 58 से.मी. लांब धारदार निमुळत्या आकाराची लोखंडी तलवार जप्त केली. आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अवैध शस्त्र शोध मोहीम राबविणे गरजेचे

सामाजिक एक्येचे प्रतीक असलेले वणी शहरात मागील काही काळापासून अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी एसपीएम शाळा परिसरात एका युवकाला तलवारीसह अटक करण्यात आले होते. शहर पोलिसांनी वेळीच कार्यवाही करून गुंड प्रवृत्तीचा बीमोड केला नाही, तर यवतमाळ शहराप्रमाणे टोळके तयार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अवैध शस्त्र शोध मोहीम राबविणे गरजेचे आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.