जितेंद्र कोठारी, वणी : शेतकऱ्यांना मागणीनुसार पीक कर्ज मंजूर करण्याचे शासन आदेश असताना सर्व साधारण शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकाचे हेलपाटे माराव्या लागत आहेत. वणी तालुक्यातील रासा येथील एका युवा शेतकऱ्यानी पीक कर्ज मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले असता घोंसा येथील इंडियन बँकेने तात्काळ पीक कर्ज मंजूर केला. राहुल शामराव धांडे असे रासा येथील युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
राहुल धांडे यांची रासा गावात 4 एकर शेती आहे. त्यांनी घोन्सा येथील इंडियन बँकेत पीक कर्जासाठी अर्ज केले होते. मात्र वारंवार बँकेच्या चकरा मारुनही वेगवेगळे कारण सांगून टाळाटाळ करण्यात आली. बँक व्यस्थापक व कर्मचाऱ्याच्या वागणुकीला कंटाळून अखेर शेतकरी राहुल धांडे यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन पीक कर्ज मंजूर करण्याची मागणी केली.
जून महिन्यात पेरणीची वेळ तोंडावर आली आहे. बियाणे, खते, तणनाशक, कीटकनाशके व इतर कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज भासते. शेतकरी राहुल धांडे यांची तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी इंडियन बँकेच्या घोंसा शाखेला तातडीने पीक कर्ज मंजूर करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने इंडियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी राहुल धांडे यांच्याशी संपर्क करुन त्यांना पीक कर्ज मंजूर करण्याबाबतचे अर्ज नागपूर येथे झोनल कार्यालयात पाठविल्याचे जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.
शाखा प्रबंधक यांना कर्ज मंजूर करण्याचे अधिकारच नाही
घोंसा येथील इंडियन बँकेच्या शाखेत अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज प्रलंबित पडून आहे. कृषी ऋणचे एनपीए वाढत असल्यामुळे पीक कर्जाचे अर्ज बँकेच्या नागपूर झोनल कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येते. बँकेच्या शाखा प्रबंधकाकडून कर्ज मंजुरीचे अधिकार काढून घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे हंगाम सुरू होऊनही शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळण्यास अडचणी होत आहे.
Comments are closed.