स्माईल फाउंडेशनतर्फे गरजूंना मोफत कपडे व इतर साहित्यांचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असणाऱ्या स्माईल फाऊंडेशनतर्फे शहरातील गोर गरीब, गरजूंना कपडे व इतर साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शुक्रवार 16 जून रोजी दुपारी वणतीली वॉटर सप्लाय केंद्र परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 400 पेक्षा अधिक गरजूंना साडी, पँट-शर्ट, लहान मुलांचे कपडे, शाल, चादर, जोडे इत्यादींचे वितरण करण्यात आले.

स्माईल फाऊंडेशनच्यावतीने शहरातील दानशूर नागरिकांच्या मदतीने व लोक सहभागातून नवीन व जुने कपडे व साहित्य गोळा करण्याचे काम सुरू होते. यात मोठ्या प्रमाणात नवीन कपडे व काही सुस्थितीत जुने कपडे जमा झाले होते. शुक्रवार 16 जून रोजी ठाणेदार पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, पत्रकार परशुराम पोटे व स्माईल फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांच्या उपस्थितीत गरजूंना या कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शहरातील रजानगर येथील बालसदन येथे जाऊन लहान मुलांना कपडे वितरण करण्यात आले.

नो फोटोसेशन, स्माईल फाउंडेशनचा नवीन पायंडा
स्माईल फाउंडेशन गेल्या तीन ते चार वर्षांपासून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. गेल्या वर्षीपासून स्माईल फाउंडेशनने साहित्य वाटपाच्या कोणत्याही कार्यक्रमाचे फोटोसेशन न करण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमातही कोणत्याही गरजूंचा साहित्य स्वीकारताना फोटो काढण्यात आला नाही. त्यांच्या या निर्णयाचे शहरात चांगलेच कौतुक होत आहे. विशेष म्हणजे इतरांनी यापासून आदर्श घेण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोफत कपडे वाटप कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्माईल फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव सह उपाध्यक्ष पियूष आत्राम, सचिव आदर्श दाढे, विश्वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, सचिन जाधव, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर, घनश्याम हेपट, मयूर भरटकर, राज भरटकर, सिद्धार्थ साठे, प्रतियुष काळे, रवी तळसे, विष्णू घोघरे या कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले. स्माईल फाऊंडेशनच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

हे देखील वाचा: 

वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

शाळेच्या सुरक्षा रक्षकाला काठीने मारहाण

Comments are closed.