ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे क्लिनरचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा भरलेल्या ट्रकची ताडपत्री व्यवस्थित करण्यासाठी ट्रकवर चढलेल्या ट्रक क्लिनरचा तोल जाऊन खाली पडला. 10 जून रोजी कोळसा व्यावसायिक नरेश जैन यांच्या कोळसा प्लॉटवर घडलेल्या या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला. नांदेड येथे दवाखान्यात उपचारा दरम्यान क्लिनरचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्युला ट्रक चालक कारणीभूत असल्याची तक्रार मृतक क्लिनरच्या वडिलांनी 27 जून 2023 रोजी वणी पोलीस स्टेशन येथे दिली. तक्रारीवरून पोलिसांनी नांदेड येथील ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल केला आहे. साईनाथ मनोहर नरवडे (22) रा. पाणशेवडी, ता. कंधार, जिल्हा नांदेड असे मृतक ट्रक क्लिनरचे नाव आहे. 

फिर्यादी मनोहर दत्ता नरवडे, रा. पाणशेवडी, ता. कंधार, जिल्हा नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा साईनाथ हा किशन ढाकणे यांचे ट्रक क्रमांक MH 26 BD 8585 वर मागील 8 महिन्यापासून खलासी म्हणून कामावर होता. ट्रक चालक जगन मोरे सोबत 25 मे 2023 रोजी साईनाथ हा कोळसा आणणे कामी वणीला आला होता. दिनांक 10 जून रोजी नरेश जैन यांचे कोळसा प्लॉटवरून ट्रकमध्ये कोळसा भरला. ताडपत्रीची दोरी व्यवस्थित बांधण्यासाठी साईनाथ ट्रकवर चढला असता ट्रक चालक जगन मोरे यांनी ट्रक सुरु करुन मागे पुढे केले. यात क्लिनर साईनाथ तोल जाऊन खाली पडला .

अपघातात क्लिनर साईनाथ किरकोळ जखमी झाल्याचे चालक जगन यांनी साईनाथचे वडील मनोहर नरवडे यांना फोनवर कळविले. तसेच तात्पुरता उपचार करवून त्याला ट्रकने वारंगा फाटा व तेथून फिर्यादीला सोबत घेऊन नांदेड येथील सिटी हॉस्पिटलमध्ये जखमी साईनाथ याला दाखल केला. त्यांनतर नांदेड येथीलच आधार हॉस्पिटल मध्ये त्याच्या पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 17 जून रोजी साईनाथ याचा मृत्यू झाला. 

क्लिनर ट्रकवर चढून असल्याची माहिती असताना ट्रक चालक जगन मोरे यांनी जाणीवपूर्वक ट्रक सुरु करुन मागे पुढे केले. त्यामुळे मुलाची मृत्यू झाल्याची तक्रार फिर्यादी वडिलांनी नोंदविली. फिर्याद वरुन वणी पोलिसांनी ट्रक चालक जगन मोरे रा. पाणशेवडी, ता. कंधार, जिल्हा नांदेड विरुद्ध कलम 304 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.