गँगरेप प्रकरणी मुख्य आरोपीला 3 तर सह आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी

जितेंद्र कोठारी, वणी: महिलेचे अपहरण करून तिचा गँगरेप केल्या प्रकरणी चार आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (39) रा. टागोर चौक वणी याला 3 दिवसांची पोलीस कोठडी तर इतर 3 सहआरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. केवळ पैसे न दिल्याने एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून याविषयी संताप व्यक्त होत आहे. दरम्यान पीडित महिलेच्या मुलाकडे आरोपीचे कोणते पैसे होते? याविषयी विविध चर्चा शहरात रंगत आहे.

राजूर कॉलरी येथील एका चुना भट्टीवर 50 वर्षीय महिला मजुरीचे करते. कारखान्याशेजारीच मजुरांची वस्ती आहे. या वस्तीत ती एका झोपडीत तिच्या मुलासह राहते. तर मुख्य आरोपी हा वणीतील एका व्यापा-याकडे दिवानजीचे काम करतो. पीडित महिलेच्या मुलाकडे आरोपी दिवानजीचे पैसे होते. बुधवारी दिनांक 28 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास चारही आरोपी एक कार भाड्याने करून पैसे मागण्यासाठी राजूर कॉलरी येथे गेले. मात्र त्यावेळी पीडित महिलेचा मुलगा घरी नव्हता. आरोपींनी मुलाबाबत पीडित महिलेला विचारणा केली असता मुलगा घरी नसल्याने तिने आरोपींना सांगितले.

तुझ्या मुलाबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची आहे अशी बतावणी करून आरोपींनी महिलेला एका ऑटोत बसवून वणीला आणले. वणीत आरोपींनी एक अर्टिगा कार भाड्याने केली. त्या कारमध्ये पीडिता व चारही आरोपी बसले. त्यांनी सुरुवातीला कार मुकुटबन मार्गावरील एका बारसमोर कार थांबवली. चार ही आरोपी बारमध्ये जाऊन दारू पिले. येताना त्यांनी एका पाण्याच्या बॉटलमध्ये दारू मिक्स करून आणली. आरोपींनी कारमध्ये पीडितेला बळजबरी दारू पाजण्याचा प्रयत्न केला. तिथून आरोपींनी मुलाचा पत्ता दे असे सांगत कार यवतमाळ रोडला वळवली. त्यानंतर ते खडकी (बुरांडा) व नंतर करणवाडी मार्गे नवरगाव गेले. तिथे त्यांनी पीडित महिलेला एका शेतात नेले व तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. एवढ्यावरच हे नराधम थांबले नाही तर त्यांनी महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य देखील केले.

घटनेनंतर रात्री उशिरा पीडितेला राजूर कॉलरीतील रेल्वे रुळाशेजारी सोडून दिले. दुस-या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवारी दिनांक 29 जून रोजी पीडितेने वणी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेची तक्रार दाखल करून घेतली व दुपार पर्यंत चार ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (39) रा. टागोर चौक वणी, कपिल व्यंकटेश अंबलवार (35) रा. जैताई नगर वणी, मनोज अजाबराव गाडगे (47) रा. रामपुरा वार्ड, वैभव घनश्याम गेडाम (22) रा. आटीआय जवळ लालगुडा यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. आरोपींवर भादंविच्या कलम 354, 354 (अ), (1), 366, 376 (ड), 504, 506 व ऍट्रोसिटीच्या 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 3 (2)(v), 3(2) (va) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा:

अज्ञात वाहनाच्या धडकेत मजूर जागीच ठार

 

आपण सततच्या ऍसिडिटीने त्रस्त आहात? वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉग

मूळव्याध म्हणजे काय? मुळव्याध कसा बरा होतो… वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.