धक्कादायक – वणी उपविभागातून 6 महिन्यात 88 तरुणी व महिला बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उप विभागातून गेल्या सहा महिन्यात तब्बल 88 सज्ञान तरुणी व विवाहित महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती आहे. वणी, शिरपूर, मारेगाव, मुकुटबन आणि पाटण पोलीस स्टेशनमध्ये 1 जानेवारी ते 30 जून 2023 पर्यंत नोंदविण्यात आलेल्या तक्रारीवरून ही माहिती उघड झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे बेपत्ता महिलांमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणी व महिलांची संख्या सर्वाधिक आहे.

सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 32 विवाहित महिला निरनिराळ्या कारणामुळे घरून बेपत्ता झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे फूस लावून पळवून नेलेल्या किंवा घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या यात समाविष्ट नाही. ही संख्या जर यात अधिक केल्यास ही संख्या आणखी वाढते.

वणी उपविभागात वणी, मारेगाव, शिरपूर, मुकुटबन व पाटण असे 5 पोलीस स्टेशन आहे. जानेवारी ते जून 2023 या कालावधीत वणी पोलीस ठाण्यात शहर व ग्रामीण भागातील 47 महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये 22, पाटण पोलीस ठाण्यात 8, तर मुकुटबन 6 व शिरपूर मध्ये 5 महिला घरुन व विविध ठिकाणाहून बेपत्ता असल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. यात मार्च महिन्यात सर्वाधिक 23 महिला व तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे

प्रेमसंबंध प्रमुख कारण…
14 ते 18 या वयोगटातील मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. अल्पवयात होणारे प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधातून प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या मुलींच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. तसेच विवाहित महिलांच्या विवाहबाह्य संबंधातून अनेक महिला प्रियकरासोबत पळून जाण्याचे पाऊल उचलतात. आपल्या कुटुंबाचा, लहान मुलांचा विचार न करताही महिला अनेकदा असे निर्णय घेतात. घरातील भांडणे, गरीबी, पटत नसणे, अपहरण, मानवी तस्करी अशी काही कारणेही यामागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तसेच स्वतंत्र जीवनशैली हेही यामागचे एक कारण असल्याचे बोलले जाते. अलिकडे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ओळख होऊन महिलांचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले असल्याचा एक रिपोर्ट आहे.

अल्पवयीन मुलीला पळवून नेले असता त्याची नोंद बेपत्ता ऐवजी अपहरण मध्ये करण्यात येते. मात्र अल्पवयीन मुलींचे बेपत्ता किंवा पळून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा मिसिंगच्या तक्रारीवर पोलीस गंभीर्यतेने लक्ष देत नाही. फाईली पेंडिंग राहते. जर अल्पवयीन मुलगी असल्यास दबावापोटी पोलीस कार्यवाही करतात. मात्र सज्ञान असल्यास पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते. विशेष म्हणजे काही महिला स्वतःहून परत देखील येतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.