स्तनांचा कर्करोग कसा होतो? महिलांनी काय काळजी घ्यावी? वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉग

बहुगुणी डेस्क, वणी: वणी बहुगुणी या पोर्टलवर आरोग्य विषयक ब्लॉग सुरू झाला आहे. यात वणीतील सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे विविध रोग, आजार आणि त्यावरचे उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या भागात स्तन कॅन्सर हा आजार आणि त्यावरचे उपचार याबाबत संपूर्ण माहिती देणार आहेत. विशेष म्हणजे डॉ. आशुतोष जाधव यांची दर रविवारी वणीत व्हिजिट असते. त्यामुळे कुणाला वैद्यकीय सल्ला घ्यायचा असल्यास त्यांना क्लिनिकमध्ये जाऊन सल्ला देखील घेता येणार आहे.

सध्याच्या काळात महिलांना होणारा सर्वात गंभीर आजार म्हणजे स्तनांचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर). हा रोग वाढत जाण्याचे गंभीर कारण म्हणजे महिलांना स्वत:लाच हा आजार झाल्याचे कळत नाही. कळत नसल्याने कॅन्सर वाढत जातो व जेव्हा कळते तेव्हा खूप उशिर झाला असतो. 40 टक्के स्तनाचा कर्करोग हा 35 ते 45 वयोगटातील महिलांना होतो. शहरात राहणा-या 25 पैकी एकीला तर खेड्यात राहणा-या 30 पैकी एकीला ब्रेस्ट कॅन्सर असण्याची शक्यता असते. शहरात या बाबत जागृती झाली असल्याने त्या वेळीच डॉक्टरकडे जातात. त्याचे वेळीच निदान होते त्यामुळे हा आकडा अधिक आहे. मात्र खेड्यातील महिला या याबाबत अद्यापही अनभिज्ञ असल्याने त्याचे निदान होत नाही. त्यामुळे खेड्यातील आकडा हा कमी असला तरी प्रत्यक्षात तो आकडा अधिक असू शकतो.

गंभीर बाब म्हणजे अधिकाधिक महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान हे पोस्ट मॉर्टमच्या वेळी होते. याचाच अर्थ असा होतो की ती महिला आयुष्यभर ब्रेस्ट कॅन्सरला सोबत घेऊन जगली. ब्रेस्ट कॅन्सर वाढत जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे महिलाच्या मनात याबाबत असलेली लज्जा. अनेक महिला याबाबत कुणाशी बोलायला टाळतात किंवा डॉक्टरकडे जाण्यास टाळतात. त्यामुळे हा रोग अधिकाधिक वाढत आहे. आजच्या भागात आपण ब्रेस्ट कॅन्सरबाबत जाणून घेणार आहोत. महिलांना वैद्यकीय सल्ल्यासाठी जाधव क्लिनिक, नांदेपेरा रोड येथे (रविवारी स. 10- सं. 5 पर्यंत) भेट घेता येईल. किंवा 9511860868, 9730106428 या क्रमांकावर संपर्कही साधता येईल.

स्तनांचा कर्करोग म्हणजे काय व का होतो?
कर्करोग हा एक स्तनांच्या पेशींमध्ये होणारा आजार आहे. हा आजार का होतो याचे कारण सांगणे कठिण आहे. मात्र बदलती जीवनशैली व अनुवांशिकता यासह अनेक कारणं सांगितली जातात. महिलांना 30- 35 वर्षांनंतर याचा धोका अधिक असतो. वय जसजसे वाढत जाते तसा धोका वाढतो. शिवाय ज्या महिला प्रसुतीनंतर आपल्या बाळास स्तनपान करीत नाही अशा मातांनाही याचा धोका असतो. मात्र सर्वात महत्त्वाचे कारण हे अनुवांशिक मानले जाते. कुटुंबातील आई किंवा बहिण हिला ब्रेस्ट कॅन्सर असल्यास कुटुंबातील इतर महिला सदस्यांना तो होऊ शकतो. वयाच्या 12 व्या वर्षाच्या आधी मासिक पाळी येणे व 55 व्या वर्षांनंतर पाळी बंद होणे, हार्मोन्सचे सप्लिमेंट घेणे, उशिरा अपत्य झाले, कुटुंब नियोजन औषधांचा अतिरेकी वापर, लठ्ठपणा इत्यादी कारणं ब्रेस्ट कॅन्सची असू शकतात.

स्तन कर्करोगाचे (ब्रेस्ट कॅन्सर) लक्षणं
सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे स्तनात न दुखणारी गाठ तयार होणे. याशिवाय स्तनाग्रातून रक्तस्राव होणे, काखेत गाठ येणे, स्तनावर जखम होणे, स्तनाच्या त्वचेत बदल होणे इत्यादी एकही लक्षण असल्यास स्तन कॅन्सरचा धोका असू शकतो. स्तन कॅन्सर महिलांना सहज ओळखता येऊ शकतो. यासाठी ‘Self-Breast Examination’ ही पद्धत वापरली जाते. म्हणजे स्वत:च स्वत:च्या स्तनांची तपासणी करणे.

करा स्वत:च स्तनांची तपासणी
ही तपासणी मासिक पाळीनंतर चार-पाच दिवसांनी करावी. तसेच स्तन सॉफ्ट किंवा मऊ असताना करावी. तपासणी करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. यात स्तनांचा आकार, रंग बदलला आहे का हे पहाणे. स्तनांना सूज येणं, स्तन लाल होणे, व्रण आले आहेत का याकडे लक्ष द्या. स्तनाग्रांची (निपल) जागा बदलली आहे का हे पाहणे, निपल आतील बाजूस गेले असतील तर लक्ष देणं गरजेचं आहे. निपलमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येतो का याकडे लक्ष ठेवा. हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या वर, खाली, डाव्या-उजव्या बाजूला आणि त्यानंतर गोलाकार पद्धतीने पूर्ण स्तनांवर हात फिरवून पाहा, तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूवार दाब द्या. जर यातील काही लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान डॉक्टरांकडून
4 ते 5 पद्धतीने डॉक्टर स्तनांच्या कॅन्सरचे निदान करतात. यात पहिल्या पद्धतीत पेशन्टची वैद्यकीय हिस्ट्री घेतली जाते व स्तनांची क्लिनिकल तपासणी केली जाते. दुसरी पद्धत आहे बायोप्सी. यात गाठीतल्या काही पेशी काढून त्यात कॅन्सर आहे का याची तपासणी केली जाते. तिसरी पद्धत सीटी स्कॅन, सोनोग्राफी (अल्ट्रासाउंड टेस्ट). गर्भधारणेदरम्यान गर्भात असलेल्या बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी सोनोग्राफी पद्धत वापरत असल्याने ही पद्धत बहुतेकांच्या परिचयाची आहे. सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे मॅमोग्राफी. अचून निदानासाठी अधिकाधिक हीच पद्धत वापरतात. जसा आपण छातीचा एक्स रे काढतो तसाच स्तनांचा विशिष्ट प्रकारे एक्स रे काढला जातो. अवघ्या काही मिनिटांमध्ये ही चाचणी होते. याशिवाय सीटी स्कॅन करून यात कॅन्सर किती पसरला आहे हाची माहिती काढली जाते. कर्करोगाचे चार टप्पे (स्टेज) आहेत. यातील कोणत्या टप्प्यात कर्करोग आहे याचे निदान केले जाते व त्यानुसारच उपचार केले जाते.

शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार आहे का?
स्तनाचा कर्करोग कसा आहे? त्यावर उपचार पद्धती अवलंबून असते. हार्मोन थेरपी – यात कर्करोगाच्या पेशी थांबवण्यासाठी किंवा त्याचा वेग कमी करण्यासाठी औषध दिले जाते. केमोथेरपी – यात कर्करोगविरोधी औषधे दिली जातात यामुळे कॅन्सर वाढण्याचा धोका टाळता येतो. मात्र कर्करोगाचे निदान झाल्यास शस्त्रक्रिया करावीच लागते. ऑपशनद्वारे स्तनातील गाढ काढण्यात येते. पूर्वीप्रमाणे सर्व स्त्रियांच्यात पूर्ण स्तन काढण्याची गरज आता राहीलेली नाही, स्तन वाचवून देखील डॉक्टर स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर मधून पूर्णपणे बरे करू शकतात. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे रेडिएशन ही पद्धत वापरून स्तनात पुन्हा कॅन्सर उद्भवू नये यासाठी उपचार केला जातो.

(मूळव्याध म्हणजे काय? मुळव्याध कसा बरा होतो… वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉक)

अप्रशिक्षित डॉक्टरांपासून सावधान….
गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक ब्रेस्ट कॅन्सरची पेशन्ट आली होती. तिच्या स्तनात गाठ होती. त्यामुळे ती उपचारासाठी एका अप्रशिक्षित डॉक्टरकडे (झोलाछाप) गेली होती. कॅन्सरची गाठ काढण्यासाठी त्या डॉक्टरने त्या गाठीवर चिरा मारला व कर्करोग अधिक गंभीर झाला. पुढे त्रास झाल्याने ती माझ्याकडे तपासणीसाठी आल्याने हा प्रकार वेळीच लक्षात आला. तिला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. सध्या कॅन्सर स्पेशालिस्ट तिचा उपचार करीत आहे. त्यामुळे महिलांच्या स्तनात गाठ असल्यास त्यांनी त्वरित प्रशिक्षित डॉक्टरांना दाखवावे व उपचार सुरू करावा, झोलाछाप डॉक्टरांकडून चिरा मारून आपला जीव धोक्यात घालू नका.

काय करावे काय करू नये?
महिलांनी वजन नियंत्रणात ठेवावे, प्रोटीन्स युक्त पदार्थ म्हणजे मांस, मासे, अंडी, मोड आलेले कडधान्ये, दूधापासून तयार झालेले पदार्थ खावे, दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे, नियमीत व्यायाम करावा किंवा किमान रोज किमान 45-60 मिनिटे फिरावे, फॅमिली प्लानिंग नसल्यास 35 वर्षांपूर्वी गर्भधारणेचा प्लान करावा, बाळाला बाटली ऐवजी स्तनपान करावे, तर साखरयुक्त पदार्थ, हार्मोन्स सप्लिमेन्ट टॅबलेट, जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, पॅराबेन्स असलेली कॉस्मेटिक्स, मद्यपान, धूम्रपान, आईसक्रिम, लोणी, पाम तेल, सॉसेजेस, बिस्किट, केक, पेस्ट्री, चीज, मेयोनिज, लाल मांस (रेड मीट) इत्यादी सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ टाळावेत.

प्रतिबंध हाच उपाय
स्तनांची वारंवार स्वतपासणी करा. स्तनांच्या आकारात बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, वय जर 35 पेक्षा अधिक असेल मॅमोग्राफी करावी. आहारात हिरव्या भाज्या, पालेभाज्या, फळे याचा वापर करावा तसेच जेवणात रोज हिरवे सॅलड आठवणीने खावे, स्तनदा माता असेल तर किमान एक वर्ष बाळाला बॉटल ऐवजी स्तनपान करावे, अतिरिक्त मद्यपान व धूम्रपान करू नये.

अधिक माहितीसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क –
पत्ता: जाधव सर्जिकल क्लिनिक, नांदेपेरा रोड, वणी
पूर्व नोंदणी साठी संपर्क: 9511860868, 9730106428
किंवा: समर्थ मेडिकल, नांदेपेरा रोड, वणी येथे संपर्क साधावा. 

सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे मुळचे वणीतील ढुमे नगर/ गुरुनगर येथील रहिवाशी असून त्यांनी शालेय शिक्षण वणीतच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी GMC नागपूर येथून आपले MBBS व MS चे शिक्षण पूर्ण केले. त्यांना दिल्लीतील सुप्रसिद्ध FMAS (FELLOWSHIP IN Minimal Access Surgery) ही फेलोशिप मिळाली आहे. शिवाय त्यांना Coloproctology या विषयातील ISCP International Society of Coloproctology द्वारा फेलोशिप मिळालेली आहे. सध्या ते नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्जन म्हणून पूर्णवेळ सेवा देतात. तसेच दर रविवारी वणी येथे वैद्यकीय सेवा देतात.

हे देखील वाचा: 

मूळव्याध म्हणजे काय? मुळव्याध कसा बरा होतो… वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉक

आपण सततच्या ऍसिडिटीने त्रस्त आहात? वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉग

Comments are closed.