जितेंद्र कोठारी, वणी : एप्रिल 2023 मध्ये येथील गांधी चौकातून मोटसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. गजानन जाधव उर्फ गजानन मधुकर चव्हाण रा. मोहुर्ली, ता. वणी असा आरोपीचा नाव आहे. पोलिसांनी आरोपीला वणी न्यायालयात हजर केले असता 21 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी मनीष पुरुषोत्तम बोढे, रा. जैन कॉलोनी वणी यांनी त्यांची पॅशन प्रो मोटरसायकल क्र.MH 34 Y 7179 ही दिनांक 23 एप्रिल रोजी गांधी चौक येथून लंपास झाल्याची तक्रार वणी पो. स्टे. येथे नोंदविली होती. सदर गुन्ह्याबाबत तपास सुरु असताना चोरी गेलेली दुचाकी कायर येथील ऑटो मॅकेनिक हसन शेख शफी याच्याकडून पोलिसांनी जप्त केली. हसन शेख यांनी मोटरसायकल मोहुर्ली गावातील अर्जुन तांदुळकर यांचेकडून 9 हजारात विकत घेतल्याची कबुली पोलिसांना दिली.
तपास अधिकाऱ्यांना मोहुर्ली येथील अर्जुन तांदुळकर यास विचारपूस केली असता त्यांनी सदर दुचाकी गावातीलच गजानन जाधव या युवकाकडून 4 हजार 500 रुपयात विकत घेतल्याचे सांगितले. गजानन जाधव याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. आरोपीचा शोध सुरु असताना डीबी पथक प्रमुख सपोनि माधव शिंदे यांना आरोपी हा मागील 4 महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत नाशिक, मनमाड, येवला व पुणे परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.
माहितीवरुन ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि माधव शिंदे व पंकज उंबरकर यांनी आरोपी गजानन जाधव उर्फ गजानन चव्हाण याला लोणी काळभोर, तालुका हवेली, जि. पुणे येथून अटक करून 17 ऑगस्ट रोजी वणी येथे आणले. दुचाकी चोरीच्या घटनेत आरोपीचा सहभाग आढळून आल्याने त्याला वणी न्यायालयात हजर करुन 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळविली. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून दुचाकी चोरीच्या आणखी काही गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
ही बातमी पण वाचा :
Comments are closed.