भास्कर राऊत मारेगाव : अवैधरीत्या कत्तलीकरिता तेलंगणा येथे नेत असलेली गोवंश जनावरांची मारेगाव पोलिसांनी सुटका केली आहे. मारेगाव येथील चार तरुणाच्या सतर्कतेमुळे 18 गोवंश जनावरांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले. मारेगाव मार्डी रोडवर असलेल्या सरोदे बेड्याजवळ रविवार 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता केलेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
सविस्तर वृत्त असे की मार्डी मारेगाव मार्गावर सरोदे बेड्याजवळ काही इसम बैलांना निर्दयीपणे बांधून व काठीने मारहाण करून पळवत नेत असल्याची माहिती मारेगाव येथील काही तरुण युवकांना मिळाली. माहितीवरुन निखिल मेहता, अनुप महाकुलकर, विशाल किन्हेकर आणि रोशन पारखी या चार युवकांनी सरोदे बेड्याजवळ जाऊन बैल घेऊन जाणाऱ्या इसमाना अडविले.
सदर इसमाना जनावरांविषयी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. जनावरांची खरेदी विक्री प्रत मागितले असता त्यांच्याकडे काहीच नसल्याचे सांगितले. यावरून तरुणांना संशय आला व त्यांनी मारेगाव पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. यावेळी जनावर घेऊन जाणारे उमेश जनार्दन चाफले (30),शंकर संभा बोजेवार(35) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर नरेश चाफले (34) व मारोती जगताप (42) रा . मारेगाव हे दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी तस्करांच्या ताब्यातून 18 गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना चारापाणीच्या व्यवस्थेसाठी गौरक्षण संस्थेत पाठविले आहे. वरील चारही आरोपीवर जनावरांना क्रूरतेने व निर्दयतेने वागवणे या कलमखाली गुन्हा नोंद केला आहे. यावेळी ताब्यात घेतलेल्या दोघांना सूचनापत्र देऊन सोडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत तसेच मारेगाव पोलिसांनी केली.
Comments are closed.