वणीकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ! पालिकेकडून गढूळ पाणी पुरवठा

युवासेनेचे मुख्याधिका-यांना निवेदन, समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

 

विवेक तोटेवार, वणी: मागील काही दिवसांपासून वणी शहरात नियमित दूषित पाणीपुरवठा होत आहे. जणू काही वणीकरांना काळ्यापाण्याची शिक्षाच आहे. यासंदर्भात युवासेनेने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी निवेदन दिले.

शहरातील अनेक भागांत गेल्या महिन्याभरापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. अनेक प्रभागांतील नागरिकांनी याबाबत नगर परिषद येथे तोंडी तसेच लेखी तक्रार दिली आहे. तरीदेखील अजूनही अनेक प्रभागांत दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत आंदोलन करण्याचा विचार केला जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये आशीर्वाद बार जवळचा परिसर, विठ्ठलवाडी, पट्टाचारा नगर, प्रगती नगर, गुरूनगर, कनकवाडी, शास्त्रीनगर, सेवानगर, माळीपूरा ही प्रमुख स्थळे आहेत. यातील अनेक भागांत नाल्यांच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याची कारणे देण्यात येत आहेत. 

 यावर्षीपासून नगर परिषदेने पाणीकरात वार्षिक 600 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ केल्यानंतरही नगर परिषदेकडून दूषित पाणी वणीकरांना पुरविले जात आहे. सध्या संपूर्ण जिल्यात डेंगूने थैमान घातले आहे. तापाची साथ सुरू आहे. रुग्णालयं रुग्णांनी भरली आहेत. अशातच नगर परिषदचे फॉगिंगकडे दुर्लक्ष आहे.

अनेक परिसरात फॉगिंग केलेले नाही. जिल्ह्यातून साथ तालुक्यात येण्यास वेळ लागणार नाही. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्यानंतर नगर परिषदेला जाग येणार आहे काय? नगर परिषदेला जर जाग येत नसल्यास युवासेना आपल्या आंदोलनाने जाग आणण्यास तयार आहे. असा दम युवासेनेकडून निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडेंसह कार्यकर्ते व प्रभागातील महिला उपस्थित होत्या.

Comments are closed.