गुरुनगर येथे भरलेल्या सिलिंडरने घेतला पेट, आगीत घरातील वस्तू जळून खाक

दुसरा सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने टळला मोठा अनर्थ

वणी बहुगुणी डेस्क: शहरातील गुरुनगर येथे आज दुपारी भरलेल्या सिलिंडरने पेट घेतला. यामुळे लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या. विशेष म्हणजे घरात दुसरा भरलेला सिलिंडर होता. हा सिलिंडर वेळीच घराबाहेर काढल्याने व सिलिंडरचा स्फोट न झाल्याने मोठी हानी टळली.    

सविस्तर वृत्त असे विलास कोळसे हे गुरुनगर येथील रहिवासी आहे. त्यांच्या घरील सिलिंडर संपल्याने त्यांनी नवीन सिलिंडर मागवले होते. सिलिंडर आल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांनी म्हणजे दुपारी 11.45 वाजताच्या सुमारास त्यांनी सिलिंडरला रेग्युलेटर लावले. सिलिंडरमधून गॅस लिक असल्याने शेगडीच्या बर्नरजवळ लायटर लावताच सिलिंडरने अचानक पेट घेतला. हा भडका इतका मोठा होता की काही क्षणातच आगीने किचनमधल्या वस्तू आपल्या कवेत घेतल्या.

आग लागताच विलास यांनी आरडाओरड केला असता घराजवळील व्यक्ती मदतीसाठी धावल्या. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशामन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यांनी आधी किचनमध्ये पेटलेल्या वस्तू पाण्याने विझवल्या. आग आटोक्यात आल्यानंतर त्यांनी जळते सिलिंडर विझवले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे अर्धा तासांचा अवधी अग्निशमन दलाला लागला.

अन् मोठा अनर्थ टळला…
विलास कोळसे यांच्या घरी दोन पूर्ण भरलेले सिलिंडर होते. सिलिंडर संपूर्ण भरलेले असल्याने आगीचा मोठा भडका उडाला. आगीचा भडका उडताच दुसरे सिलिंडर तातडीने बाहेर काढण्यात आले. जर दुस-या सिलिंडरनेही पेट घेतला असता किंवा सिलिंडरचा स्फोट झाला असता तर आग आणखी वाढली असती. 

आग लागली तेव्हा घरात दोघेच जण होते. आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली, तरी यात कोळसे यांच्या घरातील पडदे, कपडे, वस्तू, गादी, भांडी इत्यादी सुमारे 20 ते 25 हजारांच्या वस्तू जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच एचपी गॅस एजन्सीचे व्यक्ती घटनास्थळी पोहोचले होते. आग विझवण्यास अग्निशमन दलाचे देविदास जाधव, श्याम तांबे, दीपक वाघमारे, रितेश गौतम यांनी प्रयत्न केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.