विवेक तोटेवार वणी: शनिवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी मोमीनपुरा येथील आशियाना हॉल येथे सामूहिक विवाह (निकाह) सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात 19 जोडप्यांच्या निकाह झाला. आमेर बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक जमीर उर्फ जम्मू खान यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वणीतील प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. त्यांनी नव दाम्पत्यांना आशीर्वाद दिला.
संध्याकाळी 6 वाजता विराणी येथून बग्गी आणि घोड्यावर विराजमान असलेल्या नवरदेवांची वाजत वरात निघाली. ही वरात शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरून याचा शेवट आशियाना हॉल येथे झाला. 7 वाजता सामुहिक विवाह सोहळ्याला सुरुवात झाली. मौलवीद्वारा हाफिज-ए-कुराण पठन करून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे जम्मू खान यांच्याद्वारे शाल, स्मृतिचिन्ह व बुके देऊन स्वागत करण्यात आले. तर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे स्वागत जम्मू यांच्या पत्नी आसमां जम्मू खान यांनी केले.
त्यानंतर प्रमुख अतिथी असलेल्या आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रतिभा धानोरकर, फारुक चीनी इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त करत जम्मू खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रात्री. 8.30 वाजता मुख्य विवाह सोहळ्याला सुरुवात झाली. सामूहिक विवाह सोहळ्यात उपस्थित वधूवरांना 1.25 ते 1.50 लाखांच्या भेटवस्तू जम्मू शेख यांच्यातर्फे देण्यात आल्या. निकाह पार पडल्यानंतर सोहळ्यात उपस्थित सुमारे 10 हजार लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
निकाह लावण्यासाठी खास मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथून हफिज सईद अख्तर या मौलवींना बोलवण्यात आले होते. त्यांना वणीतील मौलानांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला संजय देरकर, विजय चोरडिया, भाई अमन, राकेश खुराणा, ऍड देविदास काळे, रवी बेलूरकर, हाजी फारुख, शमीम अहेमद, रज्जाक पठाण, संजय खाडे, राहुल मोटवानी, राजा पाथ्रटकर, निकेत गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
जम्मू यांचे लहानपणीचे जीवन अत्यंत गरिबीत गेले. आज त्यांची एक व्यावसायिक म्हणून परिसरात ओळख आहे. ते सतत पाच वर्षांपासून आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतात. या वर्षी त्यांनी सामुहिक निकाह सोहळ्याचे आयोजन केले व स्वखर्चाने गरजू व गरीब जोडप्यांचा निकाह लावून त्यांना प्रपंचासाठी भेटवस्तू दिल्या. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या सामूहिक निकाह कार्यक्रमाची मुख्य अट ही वर किंवा वधू यातील एक व्यक्ती वणी तालुक्यातील असणे गरजेचे होते. तसेच तलाक झालेल्या वधू वरांचा समावेश या निकाह सोहळ्यात नव्हता. गरीब जे स्वखर्चाने विवाह करू शकत नाही अशा गरीब वधू वरांसाठी हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गौतमी पाटीलच्या ‘कातिल’ अदांनी वणीकर घायाळ, प्रेक्षकांची तूफान गर्दी
Comments are closed.