बहुगुणी डेस्क, वणी: श्री काशी शिवपुराण कथेची सर्व तयारी पूर्ण झाली असून सध्या कथा स्थळी लागणा-या स्टॉलसाठी बुकिंग सुरू आहे. ही संपूर्ण कथा भाविकांसाठी मोफत असून विशेष म्हणजे बाहेरगावाहून येणा-या भाविकांसाठी आयोजकांतर्फे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 30 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तत्पुर्वी 26 जानेवारीला पं. प्रदीप मिश्रा यांच्या वणी आगमनानिमित्त भव्य शोभायात्रा निघणार आहे.
कथेसाठी नोंदणी गरजेची आहे का?
या कथेसाठी कोणतीही नोंदणी नाही. तसेच कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क नाही. दु. 1 ते दु. 4 या दरम्यान ही कथा चालणार आहे. कोणताही इच्छुक भाविक या कथेच्या रसग्रहणासाठी सहभागी होऊ शकतो.
बाहेरगावातील भाविकांची व्यवस्था?
या कथेसाठी सुमारे 5 लाखांचा आकडा गृहीत धरला गेला आहे. यात बाहेरगावाहून लाखो भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातील काही भाविक हे रोज कथास्थळी अपडाऊन करणार आहे. मात्र बरेच भाविक हे मुक्कामाच्या उद्देशाने येणार आहे. त्यामुळे त्यांच्या राहण्यासाठी सभा स्थळी, तसेच वणीतील मंगल कार्यालय, कार्यक्रम हॉल इत्यादी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
जेवणाची व्यवस्था आहे का?
मोठ्या प्रमाणात भाविक बाहेरगावाहून मुक्कामी येणार आहेत. स्थानिक भाविकांसाठी जेवणाची समस्या नसली तरी बाहेरगावाहून मुक्कामी येणा-या भाविकांसाठी ही समस्या असू शकते. त्यामुळे सभास्थळी रोज सुमारे 30 हजार लोकांच्या दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कथेसाठी येणा-या सर्व भाविकांच्या चहापाण्याची व्यवस्था देखील आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
स्टॉल बुकिंग सुरू…
या कार्यक्रमासाठी कथा स्थळी लागणा-या स्टॉलसाठी सध्या बुकिंग सुरू आहे. काही शुल्क भरून या ठिकाणी व्यवसायिकांना स्टॉल टाकता येणार आहे. यासाठी शेवाळकर परिसर येथील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व शिवभक्त राजकुमार जयस्वाल व त्यांच्या पत्नी शिवभक्त श्रद्धा जयस्वाल यांच्या पुढाकारातून आणि परिसरातील शिवभक्तांच्या साथीने श्री काशी शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सर्व पदाधिकारी आणि वणीतील विविध संस्था परिश्रम घेत आहे.
Comments are closed.