थाप मारून थापाड्या गेला… 3 लाखांचा गंडा घालून गेला…

भामट्याने केली वणीतील व्यापा-याची सिनेस्टाईल फसवणूक

बहुगुणी डेस्क, वणी: एखादी मोठी व्यक्ती बोलत आहे असे भासवून व्यापा-याला मोठी ऑर्डर करायची आणि त्यानंतर त्याला गंडवायचे. असे अनेक सिन आपण सिनेमात बघतो. मात्र असाच काहीसा प्रकार वणीतील एका व्यापा-यासोबत घडला. शहरातील एका सुप्रसिद्ध डॉक्टर साहेबांनी हॉस्पिटलसाठी एसी सांगितले आहे, अशी बतावणी करून एका व्यापा-याला भामट्याने तब्बल 3 लाखांचा गंडा घातला. सोमवारी 8 जानेवारीला शेवाळकर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवाळकर परिसरात कार्तिक नारायण देवडे (35 रा. वणी) यांचे वातानुकूलित यंत्र विक्रीचे दुकान आहे. सोमवारी दिनांक 8 जानेवारीला एक व्यक्ती यांच्या दुकानात आली. त्याने स्वतःचे नाव विक्की श्रवणकर सांगितले. वणीतील एका डॉक्टरांचे मारेगाव येथे भव्य हॉस्पिटल बनले आहे. डॉक्टर साहेबांनी एसी साठी पाठवले असून 5 एसी पाहिजे आहे, ते गाडी पाठवणार आहे, अशी त्या भामट्याने देवडे यांच्याजवळ थाप मारली.

गाडी येताच देवडे यांनी गोडावून मधून 5 एसी काढून गाडीत भरले. ज्याची किंमत 3 लाख 11 हजार रुपये आहे. दुस-या दिवशी डॉक्टरांचे पेयमेंट न आल्याने देवडे यांनी डॉक्टरांना फोन केला. तेव्हा डॉक्टरांनी त्यांनी अशी कोणतीही ऑर्डर दिली नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर देवडे यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी भादंवि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा: 

8 वी तील मुलीला लागला खर्र्याचा नाद, आईने रागवल्याने मुलीची आत्महत्या

21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पाहुणा लघवीला गेला, परत आल्यावर दुचाकी गायब

 

Comments are closed.