पुरुषोत्तम नवघरे, वणी: मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था, महिला मंच, युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारीला प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. परिसरातील सुतार समाजबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती कार्यकारणीच्या वतीने करण्यात आली आहे.
सुतार समाजचे आराध्य दैवत तथा शस्त्रांचे देव म्हणून प्रभू विश्वकर्मा ओळखले जातात. पुराणानुसार रावणाची सोन्याची लंका, पांडवांचे महाल अशा अनेक वस्तूंची निर्मिती प्रभू विश्वकर्मा यांनी केली आहे. विश्वावातील पहिले इंजिनियर म्हणूनदेखील प्रभू विश्वकर्मा यांना ओळखलं जातं. गुरुवारी सकाळी सात वाजता रांगोळी स्पर्धा होईल. सकाळी 8.30 वाजता अमन अशोकराव बुरडकर यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण होईल. त्यांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मा यांच्या मूर्ती आणि प्रतिमेची पूजा होईल.
सकाळी 9 ते 11: 00 वाजेपर्यंत शहरातून शोभायात्रा निघेल. महादेव मंदिर, सुतारपुरा, नटराज चौक, म. गांधी चौक, जटाशंकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टागोर चौक, सर्वोदय चौक, वि. दा. सावरकर चौक, भगतसिंग चौक, जामा मशीद, गाडगे बाबा चौक, नटराज चौक असा शोभायात्रेचा मार्ग राहील. सुतारपुरा येथील महादेव मंदिरात शोभायात्रेचा समारोप होईल. शोभयात्रेत बँड पथक, फटाकायची अतषबाजी, समाजातील महिला, पुरुष आणि बालकांचा सहभाग असणार आहे.
सकाळी 11 वाजता श्री प्रभू विश्वकर्मा पूजन आचल व राहुल जनार्धन वांढरे यांच्या हस्ते होईल. महिलांकरिता हळदीकुंकू कार्यक्रम होईल. दुपारी 12 वाजता प्रभू विश्वकर्मा जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश गहुकर यांच्या उपस्थितीत सुतार समाजाचे सचिव प्रकाश राखुंडे कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विजयबाबू चोरडिया, एकविरा महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष किरण देरकर, मारेगाव येथील किसन आनंदराव दुधलकर, अमन बुरडकर, सुतार समाज महिला मंचाच्या अध्यक्ष मंगला पद्माकर झिलपे, रुपक संजय अंड्रस्कर, लता सुनील झिलपे, हर्षल हरीचंद्र घोंगे आदी उपस्थित राहतील.
यावेळी समाजरत्न पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा होईल. दुपारी ३ ते ६ वा. पर्यंत. भोजनाचा कार्यक्रम तर सायं. ६ ते ९.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या सर्वच कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती सुतार समाज संस्था वणीच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments are closed.