विवेक तोटेवार, वणीः नियमित सराव हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. केवळ विद्यार्थीदेशेतच नव्हे, तर संपूर्ण आयुष्यभर आपण नियमित सराव केला पाहिजे. असं प्रतिपादन स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सागर जाधव यांनी केलं. स्थानिक आनंदनगर येथील बालविद्या मंदिरात नियमित साप्ताहिक व्याख्यानमालेला आरंभ झाला. याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना संबोधित करीत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. योगेश चिंडालिया, मुख्याध्यापक ताठे, गाताडे , कोल्हे ,राठोड ,पाझरे, राजूरकर, बोरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढं बोलताना प्रा. जाधव यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या छोट्या छोट्या; पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स दिल्यात. या प्रसंगी त्यांनी नियमिततेवर अत्यंत भर दिला. शैक्षणिक सत्र आरंभ झाल्यापासूनच आपण अभ्यासाला सुरुवात करावी असा त्यांनी आग्रह धरला. विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावं असंही त्यांनी आग्रहानं सांगितलं. निरंतर लेखनाचाही सराव करणं विद्यार्थ्यांना अत्यावश्यक आहे. अशा अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून अॅड. योगेश चिंडालिया यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून शाळा नियमित उपक्रम घेत असते. विद्यार्थ्यांना नवनव्या विषयांची माहिती मिळावी म्हणून ही साप्ताहिक व्याख्यानमाला सुरू केली असल्याचंही ते यावेळी म्हणाले. केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर विद्यार्थ्यांना सोबतच व्यवहारज्ञान मिळावं म्हणून संस्था प्रयत्नरत असल्याचं अॅड. चिंडालिया म्हणालेत. कार्यकमाचं संचालन तिराणकर यांनी केलं. आभार मोहितकर यांनी मानलेत.
Comments are closed.