हिलटॉप कंपनीत मनसेचा राडा, 3 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कार्यालयाची तोडफोड, ट्रक चालकाला मारहाण केल्याचा आरोप

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास काही मनसे कार्यकर्त्यांनी कोलार पिंपरी येथील हिलटॉप कंपनीत कामाच्या कारणावरून कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. 16 मार्च रोजी प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात तीन मनसे पदाधिकाऱ्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोलार पिंपरी या खाणीत माती व कोळसा काढण्याचे काम ‘हिलटॉप हायराईस प्रा. लि. कोलार पिपरी’ या कंपनीला मिळाले आहे. 15 मार्च रोजी मनसे कार्यकते फाल्गुन गोहोकार (40) रा. वणी, प्रवीण मांडवकर (30) रा.पिपरी, सुरज लोंढे (30) रा. पिपरी हे तिघेही कंपनीच्या कार्यालयात जाऊन आपल्या कंपनीचे ट्रक खूप धूळ उडवत आहे अशी तक्रार घेऊन गेले. दरम्यान त्यांचा कर्मचाऱ्यांशी शाब्दिक वाद झाला.

त्यानंतर तिन्ही मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात जाऊन कागदपत्रे व फाईल्स फेकल्या. तसेच संतोष सर्वनकर नामक ट्रक चालकाला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत आहे. यावेळी कंपनीचे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. सोबतच रस्त्यावर जाऊन या कंपनीच्या ट्रकची वाहतूक दोन ते अडीच तास रोखून धरली. त्यामुळे कंपनीला आर्थिक भुदंड सहन करावा लागला.

अखेर शनिवारी 16 मार्च रोजी सकाळी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर उदयकुमार विरेंद्रकुमार सिंग यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात तिन्ही पदाधिकाऱ्यां विरोधात कलम 341, 323, 447, 427, 504, 506, 34 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.