बहुगुणी डेस्क, वणी: पत्नीचा मृत्यू, मुलबाळं नाही, आजारामुळे दोन्ही पाय अधू झाल्याने निराधार अवस्थेत अत्यंत हालाखीचे जीवन जगणा-या मेंढोली येथील एका वृद्धाला विजय चोरडिया यांच्या हस्ते व्हिलचेअर देण्यात आली. जानबा करणू कोवे असे वृद्धांचे नाव आहे. कुणाचाही आधार नसल्याने ते गेल्या काही वर्षांपासून घराबाहेर देखील पडले नव्हते.
जानबा (65) हे तालुक्यातील शिरपूर जवळील मेंढोली येथील रहिवासी आहे. ते शेतात मजुरी करायचे. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या पायाला आजार झाल्याने त्यांचे दोन्ही पाय अधू झाले. त्यानंतर त्यांची पत्नी ही मजुरी करून घर चालवायची. मुलंबाळं नसल्याने केवळ पत्नीचाच त्यांना आधार होता. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला.
तेव्हापासून त्यांचा जगण्याचा आधारच गेला. त्यातच त्यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला. पुढे डोळ्यांना योग्य तो उपचार न मिळाल्याने त्यांच्या दुस-या डोळ्यावरही त्याचा परिणाम झाला. पाय पूर्णपणे निकामी आणि डोळे ही काही प्रमाणात अधू झाल्याने ते घरीच राहायचे. त्यांना उचलण्यासाठीही 3 ते 4 लोकांची मदत लागायची. त्यांची ही परिस्थिती स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांच्या पर्यंत पोहोचली.
सागर जाधव यांनी याची माहिती वणीतील समाजसेवक विजय चोरडिया यांच्या पर्यंत पोहोचवली. विजय चोरडिया यांनी जानबाला मदत करण्याचे वचन दिले. बुधवारी दिनांक 20 मार्च रोजी जानबा यांना विजय चोरडिया यांच्या हस्ते व्हिलचेअर देण्यात आली. जानबा यांचा दुसरा डोळा ही अधू आहे. डॉक्टरांनी त्यावर उपचार होणे अशक्य असल्याचे सांगितले. मात्र डोळ्याची शस्त्रक्रिया शक्य असल्यास त्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही विजय चोरडिया यांनी दिली.
विजय चोरडिया अध्यक्ष असलेल्या वणी निधी अर्बन लिमिटेड या पतसंस्थेच्या सौजन्याने ही व्हिलचेअर देण्यात आली. यावेळी स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव, आदर्श दाढे, शुभम डोंगे, उमेश पोद्दार, यासह वणी अर्बन निधी लिमिटेडचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed.