गणेशपूरजवळ भरला होता जुगार, पोलिसांची धाड आणि पळापळ

7 जुगारी आले पोलिसांच्या हाती, काही फरार... वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: गणेशपूर लगत असलेल्या एका सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली. शनिवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याजवळून 10 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशपूर जवळील एका शेताच्या शेजारी पत्त्यांचा जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती एपीआय दत्ता पेंडकर यांना मिळाली. त्यावरून ते पथकाला घेऊन घटनास्थळी गेले. तिथे पथकाला काहीजण गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकताच तिथे एकच पळापळ सुरु झाली. मात्र यातील 7 जण पोलिसांच्या हाती लागले तर इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.

दत्तू रामलू कसरेवार (४१), रा. गणेशपूर, उमेश एकनाथ खापणे (४३), रा. रविनगर वणी, मंगेश बाबाराव जगताप (३६), रा. गणेशपूर, अमर रेमाजी मडावी (४४), रा. गणेशपूर, रूपेश शांताराम वाघमारे (४७), रा. छोरिया लेआऊट गणेशपूर, पुरुषोत्तम सापे (५५), रा. छोरिया लेआऊट, अतुल राजू घुग्गुल (२७), रा. गणेशपूर असे पोलिसांच्या हाती लागलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्याजवळून १० हजार ७०० रुपये रोख व गंजीपत्ते असा मुद्देमाल जप्त केला आहे. या सातही आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर व पोलिस पथकाने केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.