तेजापूर-गणेशपूर रस्त्यासाठी गावक-यांचे उपोषण

कंपनीने रस्ता न केल्यास वाहतूक बंद करण्याचा संजय खाडे यांचा इशारा

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील तेजापूर-चिलई-गणेशपूर या रोडची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकीचे अपघात होत आहे. सिमेंटचा रस्ता व इतर मागणीसाठी दिनांक 1 ऑगस्ट पासून तेजापूर, चिलई व गणेशपूर येथील ग्रामस्थांनी कंपनीविरोधात साळखी उपोषण सुरु केले आहे. या उपोषण मंडपाला काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी भेट दिली. त्यांनी गावक-यांशी चर्चा करीत उपोषणाला पाठिंबा दिला व कंपनीच्या अधिका-यांशी बोलणे केले. जर कंपनीने गावक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर कंपनीची वाहतूक बंद करणार असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

तेजापूर, चिलई, गणेशपूर परिसरात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. या परिसरात एकस्लो फिनली लिमीटेड, सूर्या डिलाईट, ईशान कॅल्सी या कंपनी कार्यरत आहेत. तेजापूर-चिलई हा रस्ता 10 वर्षांपूर्वी बनवण्यात आला होता. मात्र या रोडवर कंपनीची मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक चालते. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा असल्याने खड्डे भरले आहेत. त्यामुळे दुचाकीचे सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.

कंपनीने दुर्लक्ष केल्यास आंदोलन – संजय खाडे
कंपनी परिसरातून मोठ्या प्रमाणात खनिज काढते. त्यातून कंपनी मोठे उत्पन्न कमावते. ओव्हरलोड वाहतुकीमुळेच रस्ता खराब झाला आहे, परिसरातील पिकांवर प्रदूषणाचा परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देणे कंपनीचे कर्तव्य आहे. कंपनीची ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही. जर याकडे गावक-यांच्या मागणींकडे दुर्लक्ष केले तर या मार्गावरून कंपनीची वाहतूक बंद केली जाईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आंदोलकांशी चर्चा करताना संजय खाडे

यावेळी पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर व-हाटे, तेजराज बोढे, प्रमोद वासेकर, उत्तमराव गेडाम, प्रशांत गोहोकार, अशोक चिकडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.