कॉलेजच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

गावात शोककळा.. मित्रही हादरले...

बहुगुणी डेस्क, वणी: कॉलेजमध्ये शिकणा-या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथे ही घडली. मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. साहिल वामनराव डाखरे (18) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मारेगाव येथील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत इयत्ता 12 व्या वर्गात शिकत होता. मंगळवारी साहिलच्या घरचे शेतात गेले होते. तेव्हा घरी कुणी नसल्याची संधी साधून साहिलने गळफास घेतला. संध्याकाळी घरची मंडळी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. साहिल गेल्या काही दिवसांपासून कॉलेजमध्ये नियमीत नसल्याचे बोलले जात आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे साहिलचे मित्र प्रचंड हादरले आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.