दुसऱ्यांची वेदना आपली करणे हीच संत रविदासांची शिकवण – सुषमा अंधारे

संत रविदास महाराज  जयंतीच्या पहिल्या प्रबोधन पर्वात साधला संवाद

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: दुसऱ्यांची वेदना आपली करावी. जोपर्यंत ती आपली होत नाही, तोपर्यंत गोड बोलावं. वाणी रसाळ ठेवावी. हीत संत रविदास महाराजांची शिकवण होती. ते सर्वसामान्य कुटुंबातले होते. त्या काळातली राजघराण्यातली स्त्री अर्थात संत मीराबाई त्यांना आपला गुरु मानते. त्यांना संत रविदास जवळचे वाटतात. गुरु वाटतात. ते मीराबाईने करू नये म्हणून राजघराण्यातल्या लोकांनी त्यांचा घात केला.

तसं पाहता एरवी शिष्याची ओळख त्याच्या गुरुमुळे होते. मात्र संत रविदास महाराजांमुळे त्यांच्या गुरुंना विशेष ओळख मिळाली. असे प्रतिपादन शाहू, फुले, आंबेडकरी विचारवंत सुषमा अंधारे यांनी केले. त्या संत रविदास महाराज जयंती उत्सवातील प्रबोधनाच्या पहिल्या पर्वात बोलत होत्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी विचारपीठावर एकविरा बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष किरण देरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश अध्यक्ष मीना भागवतकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महिला आघाडीच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुनिता लांडगे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ, युवती आघाडीच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रणोती बांगडे, पांढरकवडा येथील लीला भेले, राष्ट्रीय चर्मकार संघाच्या राज्य उपाध्यक्ष रेखा लिपटे, मीना संबा वाघमारे, राज्य कोषाध्यक्ष मीनाक्षी डुबे, तालुका अध्यक्ष वंदना लिपटे या मान्यवर विचारपिठावर उपस्थिती होत्या.

त्यांचा यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघ महिला आघाडीच्या सर्व सदस्यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि संविधानाची प्रत देऊन सत्कार केला. तसेच ओबीसी (व्हीजे,एनटी,एसबीसी) जातनिहाय जनगणना समिती आणि संबा वाघमारे परिवाराकडून सुषमा अंधारे यांचा सत्कार झाला.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, संत रविदास महाराजांना वेगवेगळ्या परिक्षेत्रात समजून घ्यावे लागतात. त्यांचं आणि आपलं माय-लेकराचं नातं आहे. गाय आणि वासराचं नातं आहे. व्याख्यानाच्या दिवशी नेमका व्हॅलेंटाईन डे म्हणजेत प्रेमाचा दिवस होता. त्यावर अंधारे यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, प्रेम फक्त ‘तिचं’ आणि ‘त्याचं’ नसतं. ते माय लेकराचंदेखील असतं.

संत रविदास यांनी आईचं प्रेम काय असतं ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं. खरा ज्ञानी तोच ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे. अन्यथा त्या ज्ञानाला अर्थच नाही. प्रेमाची हीच भाषा संत रविदास यांच्या लेखणीत उतरते. १५ व्या शतकातले 16 नावांनी ओळखले जाणारे संत रविदास आजही सर्वांच्या काळजात आहेत.

सुषम अंधारे पुढे म्हणाल्या की, त्यांचा विरोध अंधश्रद्धांना आहे. संत रविदासांसोबत सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं. त्यांनी अनटचेबल हा ग्रंथ संत रविदासांना अर्पण केला आहे. माणसानं माणसाला माणसासारखं वागवले पाहिजे. माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी. माणसांच्या जातीचं गोडबंगाल कोणी काढलं ते लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या पाठीला रबर नाही, तर कणा आहे. त्यामुळे ताठ उभे राहा.

संत रविदास म्हणतात की, संपूर्ण जगातील मानव हे चामड्याचे बनलेले आहेत. सगळे सारखेच आहेत. आपल्यात काहीच वेगळेपण नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्थेची ही उतरंड बाबासाहेबांनी फोडली. हा विचार संत रविदासांनीही सांगितला आहे. आपण पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तक वाचणारं मस्तक, कुणापुढेही नतमस्तक होत नाही. आपली ओळख मिटायला नको. ती बुलंद व्हायला हवी. आपली अस्मिता ही जात आणि धर्माच्या पलीकडची आहे. ती जपली पाहिजे.

आपला इतिहास जुना आहे. तो आम्हाला माहीत असला पाहिजे. कायदा लिहिला गेलाय; पण त्याची योग्य अंमलबजावणी करणारे नाहीत. व्यवस्थेची चिरफाड करणाऱ्यांना बहिष्कृत केलं जातं. आपण जिवंत आहोत याचं एकमेव लक्षण म्हणजे आपण विचार करतो. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर जर लोकोद्धारासाठी होत नसेल तर ती कामाची नाही. आत्तापर्यंत आमच्या रविदास आज मनपटलावर ठाशीव स्वरूपात आहेत.

त्यांचा एक तरी विचार अंगीकारला तर ती जयंती साजरी करण्याचा अर्थ आहे. प्रत्यक्षात शोषितांचे लढे लढण्यासाठी शोषकांचे प्रतिनिधी घुसतात. म्हणून आपला भक्कम अजेंडा ठरवा. कारण ज्यांचा अजेंडा एक असतो त्यांचाच झेंडा फडकतो.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश अध्यक्ष मीना भागवतकर म्हणाल्या की, आज व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस आहे. संविधानाने मला आणि आपल्या सर्वांना प्रेम करण्याचा अधिकार दिला. तर आपणही संविधानावर प्रेम करूया. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हे असे व्यक्तिमत्व होते, ज्यांनी कुठल्याही विशिष्य जातीत अडकून न राहता सर्वांसाठी खूप मोठं कार्य केलं.

प्रस्तावना करताना प्रियंका आसोरे यांनी सांगितले की, 1984 पासून वणीत संत रविदास जयंती सुरू झाली. संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र सुरू झाले. वंचित आणि शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रयत्न होतात. गतधवांना साडीचोळी प्रदान करून इथे सन्मान केला जातो. कोरोना काळात गरजवंतांना अन्यधान्यांची किट वाटप करण्यात आली.

यावेळी कुसुम अभिमान काकडे, प्रेमिला मेघराज खंडाळे, जयश्री खंडारे, ज्योती नरेश सुभे, अनसूया बांगडे, गंगुबाई डुबे, राधाबाई डुबे, आम्रपाली बांधणे, मैना किसन लिपटे, योगिता बांगडे, मेघा येरेकर, सोनाली गिरडकर, भावना महिपाल डुबे, निर्मला पवार, मंदा नानाजी गुजरकर, सविता भास्कर वराड, मीना सूर्यवंशी, निलाबाई गिरडकर, मनीषा सुरेश गिरडकर या महिलांचा पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार झाला. तसेच शारीरिक अपंगत्व असलेली अश्विनी गणेश नंदुरकर यांचा सत्कार झाला.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून किरण देरकर यांनी आपले विचार मांडलेत. त्या म्हणाल्या की, संत रविदास महाराजांनी अखंड प्रबोधन त्या काळामध्ये केलं. त्यांनी जयंती चळवळीच्या माध्यमातून साजरी होते ही आनंदाची बाब आहे. आपल्या समाजातील घटकांना एकत्रित करून, संघठित करून, एक मोठं विचारपीठ संत रविदास यांच्या जयंतीच्या निमित्ताने उभं झालं. एक मोठं प्रबोधन केंद्र या ठिकाणी तयार केलं.

या माध्यमातून समाजातील महिलांना, युवकांना या चळवळीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहीत केलं जातं. हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे, असे समाजभूषण संबा वाघमारे यांना त्यांच्या या कार्यासाठी देरकर यांनी शुभेच्छा दिल्यात. आज नवी समाजव्यवस्था निर्माण झालेली आहे. तिला बळकट केले पाहिजे. आपापल्या समाजातील तळागातील घटकाला प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्या गतधवांसाठी समाजामध्ये काम करतात. हे करत असताना बऱ्याच अडीअडचणींना सामोरे जावे लागते.

गेल्या पाच ते सात वर्षांपासून त्या चळवळीमध्ये सक्रीय आहेत. आता यावर्षी संजय देरकर आमदार झालेत. परंतु त्याच्या आधी त्यांना या प्रशासकीय कामांसाठी किंवा महिलांना न्याय मिळवून देताना बऱ्याच अडचणी येत होत्या. आपण माता भगिनींना अशा काही अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी आपण खंबीरपणे त्यांच्या सोबत असावं अशी विनंती किरण देरकर यांनी केली. संचालन देवेंद्र बच्चेवार यांनी केले. तर आभार भारती दौलत वाघमारे यांनी मानले. समाजबांधवांसह विविध चळवळीतील प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.