दुचाकीवर लटकवलेल्या बॅगेतील 1 लाख व चेक लंपास

गौराळा फाट्याजवळील घटना, चालक शौचास गेला आणि...

बहुगुणी डेस्क, वणी: मालकाने त्याच्या चालकाला बँकेत भरण्यासाठी दिलेले पैसे व चेक असलेली बॅग कुणीतरी पळवून नेली. या घटनेत 1 लाख रुपये रोख व चेक चोरीला गेले. सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मारेगाव-वणी मार्गावर गौराळा फाट्याजवळ ही घटना घडली. चालकाच्या मते तो शौचास उतरला असता दुचाकीला लटकवलेली बॅग कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेली. या प्रकरणी मालकाने चालकाविरोधात तक्रार दिली असून चालकाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

तक्रारीनुसार, नवनीत दौलतराव जवादे (36) हे निर्मिती नगर मारेगाव येथील रहिवासी आहे. त्यांचे मारेगाव येथे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्याकडे असलेला चालक (38) नेहमी बँकेचे देखील काम करतो. सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी नवनीत यांनी त्यांच्या चालकाला 3 लाख 55 हजारे रोख व चेक मारेगाव व वणी येथील बँकेत जमा करण्यासाठी दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चालक हा सकाळी मारेगाव येथील बँकेत गेला. त्याने 2 लाख 55 हजारांची रक्कम बँकेत जमा केली. त्यानंतर चालक त्याच्या मोटार सायकलने वणी येथील बँकेत 1 लाख रुपयांची रोख व चेक जमा करण्यासाठी मारेगावहून वणीकडे निघाला. दरम्यान 11 वाजताच्या सुमारास नवनीत यांना चालकाचा कॉल आला. त्याने पैशाची बॅग व चेक कुणीतरी चोरून नेल्याचे सांगितले.  

दुचाकीवरून बॅग लंपास !
नवनीत यांनी चालकाला विचारणा केल्यावर त्याने तो गौराळा फाट्याजवळ शौचासाठी थांबला. त्याने त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली व तो शौचास गेला. मात्र परत आल्यावर त्याला पैसे व चेक ठेवलेली लटकवलेली बॅग आढळून आली नाही. कुणीतरी ही बॅग पळवल्याची माहिती त्याने मालकाला दिली. त्यानंतर नवनीत यांनी दिवसभर वारंवार चालकाला पैशाबाबत विचारणा केली. मात्र त्याने पैसे दिण्यास नकार दिला. अखेर नवनीत यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठले व चालकाविरोधात तक्रार दिली.

पोलिसांनी चालकाविरोधात बीएनएसच्या कलम 316 (4) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

संजय खाडे यांचे काँग्रेसमधून निलंबन मागे

Comments are closed.