बहुगुणी डेस्क, वणी: उन्हाळा म्हटलं की लग्नाचा सिजन. काही लग्नांसाठी तर अनेकांना सहपरिवारच जावं लागतं. पर्यायानं घर 1-2 किंवा त्याहून अधिक दिवस कुलुपबंद. यावर पाळत ठेवतात, ते भुरटे चोर आणि दरोडेखोरही. चोरांसाठी ही चांदीच चांदी असते. आणि हे चोरटे या संधीचं सोनं करतातच. अशीच घटना चिखलगावातील बोढले ले-आऊटमध्ये घडली. व्यवसायानं डॉक्टर असलेल्या हेमंत पुरुषोत्तम देठे (37) यांच्या घरी जबर चोरी झाली. यात जवळपास 4.5 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
तक्रारीनुसार हेमंत पुरुषोत्तम देठे हे लग्नासाठी नागपुरला गेले होते. ते 19 एप्रिलला दुपारी 2 च्या सुमारास नागपुरसाठी रवाना झालेत. त्यानंतर लग्न वगैरे आटोपून ते 24 एप्रिलच्या सायंकाळी अंदाजे 4च्या दरम्यान आपल्या घरी चिखलगावला परतलेत. तेव्हा त्यांना दारातच मोठा धक्का बसला. घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी-कोयंडा कापलेला त्यांना दिसला. संशय बळावताच ते बेडरूममध्ये गेलेत. तिथलं लोखंडी कपाट चोरट्यांनी फोडलं होतं. त्यातील वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. घरी खूप मोठी चोरी झाल्याचं हेमंत क्षणातच पुरुषोत्तम देठे यांच्या लक्षात आलं.
या चोरीत अंदाजे 1 लाख 60 हजार रूपये किमतीची 20 ग्रॅमची सोन्याची दोन मंगळसूत्रं, अंदाजे 80 हजार रूपये किमतीच्या प्रत्येकी 5 ग्रॅमच्या 2 म्हणजेच एकूण 10 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, लहान मुलीच्या अंदाजे 32 हजार रूपये किमतीच्या प्रत्येकी 2 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, अंदाजे 32 हजार रूपये किमतीचा सोन्याचा गोफ, अंदाजे 10 हजार रूपये किमतीचे चांदीचे ६ चाळ, 1 लाख 35 हजार रूपये रोख असा एकुण 4 लाख 49 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केला. फिर्यादी हेमंत पुरुषोत्तम देठे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीवर कलम 331(4), 305(a)BNS अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास पोउपनि सुदाम आसोरे करीत आहेत.
वाढते चोर, जिवालाच घोर
शहरात दिवसेंदिवस चोरी व घरफोडीच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे सर्वांच्याच जिवाला घोर लागला आहे. ऐन लग्नसराईत सातत्यानं होणाऱ्या घरफोडींमुळे वणीकर त्रस्त आहेत. चोरट्यांनी मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही लावलेले दुकाने देखील सोडले नाहीत. तीन वर्षांपासून हे घरफोडीचे सत्र सुरु आहे. मात्र काही अपवाद वगळता यातील अनेक घरफोडीचा पोलिसांना छडा लावता आला नाही. पोलािसां पुढे चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान आहे. यात ते किती यशस्वी ठरतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
Comments are closed.