बहुगुणी डेस्क, वणी: विटांचे तुकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय तरुणीवर एका नराधमाने अत्याचार केला. गुरुवारी दिनांक 1 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान निर्गुडा नदीजवळील गॅस गोडावूनच्या मागे असलेल्या निर्जन ठिकाणी ही घटना घडली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी नराधमाविरोधात शारीरिक अत्याचार, अनैसर्गिक अत्याचार यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अत्याचार करणारा आरोपी फरार आहे.
पीडित तरुणी (18) ही वणीतील एका भागातील रहिवासी आहे. गुरुवारी दिनांक 1 मे रोजी दुपारच्या सुमारास ती निर्गुडा नदीजवळील एका वीट भट्ट्याजवळ विटांचे तुकडे गोळा करण्यासाठी गेली होती. ती विटांचे तुकडे गोळा करताना अचानक तिथे एका नराधम पोहोचला. त्याने तरुणीस मागून जाऊन पकडले व तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. नराधमाने पीडितेचे कपडे फाडत तिला जवळच असलेल्या गॅस गोडावूनच्या मागे फरफटत नेले. येथे एका डबक्याजवळील काटेरी झुडपात पीडितेला नेऊन नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचारही केला.
अत्याचार झाल्यानंतर नराधम तिथून पसार झाला. घटनेनंतर पीडिता तिथे काही वेळ पडून होती. त्यानंतर ती घरी गेली व तिने झालेली सर्व हकिकत तिच्या वडिलांना सांगितली. तिचे वडिल या घटनेमुळे हादरले. त्यांनी पीडितेला सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी आरोपीविरोधात तक्रार दिली.
पीडितेचे तात्काळ मेडिकल करण्यात आले. यात पीडितेवर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पीडितेच्या बयानावरून अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 64(1), 64(1) (2), 138, 76, 115 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अत्याचार करणारा नराधम फरार आहे. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहे. सदर पीडितेचे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याची (गतीमंद) माहिती आहे. घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक धनंजय रत्नपारखी करीत आहे. या घटनेमुळे वणीत एकच खळबळ उडाली आहे.
Comments are closed.