बहुगुणी डेस्क, वणी: एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. मंगळवारी दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी वणी शहरात ही घटना घडली होती. पळवून नेताना मुलाने मुलीच्या मामाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न देखील केला होता. याबाबत तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी पळवून नेणा-या मुलाच्या पोलिसांनी भद्रावती येथून मुसक्या आवळल्या आहे. अनिकेत नांदे (20) रा खरबडा मोहल्ला वणी असे पळवून नेण्या-या तरुणाचे नाव आहे. अवघ्या एका दिवसातच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.
फिर्यादी ही वणीतील एका वार्डात राहत असून ती तिच्या पती व मुलींसह राहते. तिची मुलगी ही 14 वर्ष 3 महिन्यांची असून ती गेल्या काही काळापासून नागपूर येथे तिच्या आजीकडे (फिर्यादीच्या आईकडे) शिक्षणाच्या निमित्ताने राहते. सध्या शाळेला सुटी असल्याने ती वणी येथे आली होती. मंगळवारी दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी त्यांची मुलगी घरी दिसली नाही. तसेच तिचा मोबाईलही बंद होता.
दरम्यान मुलीच्या आईला तिची मुलगी एका मुलासोबत नांदेपेरा रोडवर असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून मुलीचे मामा त्याच्या एका सहका-याला घेऊन लोकेशनवर गेले होते. तिथे त्यांना एका कारमध्ये त्यांना त्यांची भाची एका तरुणासोबत बसलेली आढळली. मुलीच्या मामाला पाहताच मुलाने त्यांच्या अंगावर कार नेली होती. मात्र यातून ते थोडक्यात बचावले. त्यानंतर गाडीतून उतरून मुलगा मुलीला घेऊन पसार झाला होता. याबाबत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
अशा आवळल्या मुलाच्या मुसक्या !
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेतला. खबरींना कामाला लावले. दरम्यान त्यांना मुलाचे लोकेशन हे भद्रावती येथे असल्याचे कळले. पोलिसांचे एक पथक मुलगा व मुलगी असलेल्या ठिकाणी गेले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत गुरुवारी सकाळी वणी पोलीस ठाण्यात आणले. दोघांचीही चौकशी करण्यात आली. मुलीला आईच्या स्वाधीन करण्यात आले तर आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणी आरोपी अनिकेत नांदे (20) रा. खरबडा मोहल्ला याची पोलीस कसून चौकशी करीत आहे. सध्या आरोपीवर बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल आहे. प्रकरणाच्या तपासानंतर कलम वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रकरणाचा तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात सचिन मरकाम करीत आहे.



Comments are closed.