भामट्याने घातला गंडा, स्टेट बँकेसमोरून 2 लाख रुपये लंपास

पैसे पडल्याची बतावणी करीत दुचाकीच्या डिक्कीतून काढली रक्कम

बहुगुणी डेस्क, वणी: बँकेतून काढलेली 2 लाखांची रक्कम एक भामट्याने गंडा घालून लंपास केली. गुरुवारी यवतमाळ रोडवरील एसबीआयच्या साई मंदिर ब्रँच समोर ही घटना घडली. हा गंडा घालताना भामट्याने जुनीच शक्कल लढवली. शेजारी काही पैसे टाकून पैसे पडल्याची बतावणी केली व दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले 2 लाख रुपये हातोहात लंपास केले. या प्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात राजूर येथील एका इसमाचे 50 हजार रुपये याच ठिकाणाहून एकाने लंपास केले होते.

तक्रारीनुसार, फिर्यादी दिलिप ज्ञानोबाजी नारनवरे हे रा. विद्यानगरी वणी येथील रहिवासी असून ते निवली येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत. त्यांचे साईमंदीर समोरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अकाउंट आहे. गुरुवारी दिनांक 22 मे रोजी दु. सव्वा 3 वाजता बँकेत त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीने गेले होते. त्यांनी बँकेच्या खात्यातून 2 लाखांची रक्कम काढली. रक्कम काढल्यानंतर त्यांनी ही रक्कम दुचाकीच्या लेदर डिक्कीत ठेवली.   

वापरली गंडा घालण्याची जुनीच पद्धत
पैसे डिक्कीत ठेवल्यानंतर ते गाडी स्टार्ट करीत होते. दरम्यान तिथे एक अनोळखी इसम आला. त्याने दिलीप यांना तुमचे पैसे खाली पडले असे सांगितले. त्यांना वाटले की खिशातील पैसे खाली पडले असावे, म्हणून ते दुचाकीवरून उतरून रस्त्यावर पडलेले पैसे उचलण्यास गेले. पैसे उचलून दुचाकीजवळ आल्यावर त्यांना दुचाकीची डिक्की उघडी दिसली. तसेच त्यातील रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

भामट्याने गंडा घातल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सदर इसमाचा शोध घेतला. मात्र तो अवघ्या काही क्षणातच पसार झाला होता. दिलीप यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहे.

याच बँकेसमोरील ही दुसरी घटना
मार्च महिन्यामध्ये अशीच एक घटना याच बँकेसमोर घडली होती. राजूर येथील एका व्यक्तीने या शाखेतून 50 हजारांची रक्कम काढली होती. त्यानंतर ते समोरील एका पानटपरीवर थांबले होते. दरम्यान एका भामट्याने त्यांनी पिशवीत ठेवलेले पैसे क्षणात लंपास केले होते. सातत्याने अशा घटना घडत असल्याने पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (वाचा जुनी बातमी…)

बँकेतून काढलेली 50 हजारांची रोकड हातोहात लंपास

सावधान ! लग्नासाठी आलेल्या महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

Comments are closed.