सावधान ! लग्नासाठी आलेल्या महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट, महिला टारगेटवर.... सिजन लग्नाचा, मज्जा चोरट्यांची !

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या वणीमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. घरफोडी, चेन स्नॅचिंग, पाकीटमारी, पर्स चोरी अशा घटनांनी वणी गेल्या काही दिवसांपासून हादरून गेले आहे.  सध्या लग्नाचा सिजन सुरु झाल्यापासून लग्नात तसेच बसस्थानकावर चोरीच्या घटना घडत आहे. यात महिलावर्ग चोरट्यांच्या टारगेटवर आल्या आहेत. मंगळवारी अशीच एक घटना वणी बसस्थानकावर घडली. यात चोरट्याने बसस्थानकावर एका महिलेच्या पर्समधले सुमारे अडीच लाखांचे दागिने लंपास केले. चोरटे गवसत नसल्याने अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहे. त्यामुळे महिलांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे.    

तक्रारीनुसार, दिनांक 20 मे रोजी संगिता प्रभाकर बोबडे (55) राहाणार दुर्गापूर चंद्रपूर या त्यांच्या भाच्याच्या लग्नासाठी कुटुंबीयांसह वणीत आल्या होत्या. दुपारी त्या विठ्ठलवाडी येथील तिरुपती मंगल कार्यालयात गेल्या. लग्न आटोपल्यानंतर त्यांनी लग्नात घातलेले सोन्याचे तीन ते साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र त्यांच्या पर्समध्ये ठेवले. त्यानंतर त्या चंद्रपूरला परत जाण्यासाठी बसस्थानकावर गेल्या.  

दु. पावने 2 ची बस त्यांना मिळाली. त्या बसमध्ये बसल्या. बस नुकतीच शहराबाहेर आली होती. संगीता त्यांच्या जवळ असलेला स्कार्फ पर्समध्ये टाकण्यासाठी गेल्या असता त्यांना पर्सची चैन उघडी दिसली. त्यांनी पर्समध्ये ठेवलेले मंगळसूत्र बघितले असता ते त्यांना लंपास झालेले आढळले. तसेच पर्समधले नगदी दीड हजार रुपये देखील चोरट्याने उडवल्याचे लक्षात आले. या घटनेत त्यांचा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बस लावली वणी पोलीस ठाण्यात
अशीच एक घटना याच दिवशी घडली. मंगळवारी दिनांक 20 मे रोजी दु. 3.30 वाजताच्या दरम्यान माया मधुकर कारेकर रा. नेत ता. मारेगाव या वृदध महिला वरो-याहून चंद्रपूर-पांढरकवडा या बसमध्ये वणीसाठी बसल्या होत्या. दरम्यान पाटाळ्यापर्यंत आल्यावर त्यांना त्यांच्या हँडबॅगमध्ये एक छोट्या पर्समध्ये एक तोळ्याचा सोन्याचा गोफ, अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी व सुमारे तीन हजार रुपये रोख रक्कम कुणीतरी चोरल्याचे लक्षात आले. त्यामुळे बस वणी पोलीस ठाण्यात लावण्यात आली. तिथे सर्व प्रवाशांची झडती घेण्यात आली. मात्र चोरीला गेलेला मुद्देमाल आढळला नाही. त्यामुळे ही घटना वरोरा बसस्थानकावरच घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चोरटे काही केल्या गवसेना
वणीत सध्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. घरफोडी, चैन स्नॅचिंग, पाकिटमारी, भामटेगिरी अशा घटनांनी अलिकडे चांगलेच डोके वर काढले आहे. यातील अवघ्या एक दोन घटनांची उलक झाली तर इतर घटनांमधले आरोपी अद्यापही मोकाटच आहे. दिवसाढवळ्या बसस्थानक किंवा बँकेसमोरून चोरटे डल्ला मारीत आहे. चोरटे काही केल्या गवसेना व घटना काही केल्या थांबेना अशी परिस्थिती वणीत सध्या निर्माण झाली आहे. सातत्याने घडणा-या घटनांमुळे वणीकर चांगलेच दहशतीत आले आहे.

भामट्याने घातला गंडा, स्टेट बँकेसमोरून 2 लाख रुपये लंपास

Comments are closed.