नांदेपेरा मार्ग गेला खड्डयात…! मनसेचे खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन
राजू उंबरकर यांची बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा चौफुलीपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या मार्गावरील एका पाण्याने भरलेल्या खड्यात बसून आंदोलन करीत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान मनसे नेते राजू उंबरकर यांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. उपविभागीय अधिकारी व अभियंते कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे एक तास कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून उंबरकर यांनी बांधकाम विभागाच्या विरोधात धरणे दिले.
साई मंदिर ते नांदेपेरा चौफुली या रस्त्यावर रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरणाबाबत बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दोन महिन्यांपासून पत्रव्यवहार केला होता. मात्र, बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष करीत रस्त्याची दुरुस्ती केली नाही. अखेर मनसेने आंदोलन केले. बांधकाम विभागाने प्रतिनिधी पाठवून आंदोलकांशी चर्चा केली. दोन दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
राजू उंबरकर यांची कार्यालयात धडक
अधिकारी आंदोलनस्थळी येण्यासाठी टाळाटाळ करीत होते. त्यामुळे मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयावर धडक दिली. उपविभागीय अधिकारी व अभियंते कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे एक तास कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून उंबरकर यांनी बांधकाम विभागाच्या विरोधात धरणे दिले. उपविभागीय अभियंता केतन परतानी व अभियंता हितेश राठी हे कार्यालयात येताच, उंबरकर यांनी त्यांना आपल्या वाहनात बसविले व थेट नांदेपेरा मार्गावर आणून रस्त्यावरील परिस्थिती निदर्शनास आणून दिली. दरम्यान, आमदार संजय देरकर यांनासुद्धा आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांशी संवाद साधला. कार्यकारी अभियंत्यांनी दोन दिवसांत काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या आंदोलनात मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, खरेदी-विक्री संघाचे संचालक विनोद कुचनकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, मयूर गेडाम, मयूर घाटोळे, गोविंदराव थेरे, संतोष जयस्वाल, मतीन शेख, विलन बोदाडकर, रमेश पेचे, राजू बोदाडकर, धीरज पिदूरकर आदी सहभागी झाले होते.



Comments are closed.