रात्री हळदीला जातो सांगून घरून निघाला, पहाटे आढळला मृत….

19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या लग्नाच्या हळदीला जातो सांगून रात्री घरून निघालेल्या एका तरुणाने गळफास घेतला. सोमवारी दिनांक 2 जून रोजी पहाटेच्या सुमारास गांडली पुरा येथे ही घटना उघडकीस आली. सुमीत शरद कामटकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र परिसरात विविध चर्चेला उधाण आले आहे.

मृत सुमीत शरद कामटकर (19) हा सेवानगर येथील रहिवासी होता. तो आयटीआयला शिकत होता. रविवारी दिनांक 1 जून रोजी रात्री सुमीतने घरी जेवण केले. जेवणानंतर तो घरी वडिलांना मित्राच्या लग्नाची हळद आहे, असे कारण सांगून घरून निघून गेला. तसेच रात्री उशीर होणार असल्याने घरी येणार नाही असा निरोप देखील त्याने दिला. मात्र पहाटे तो नारायण निवास समोरील गांडली पुरा येथील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या एका घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

पहाटे सव्वा चार वाजताच्या सुमारास त्याच्या मित्राने सुमीतच्या वडिलांना सुमीतने गळफास घेतल्याची माहिती दिली. त्याचे वडील तातडीने घटनास्थळी गेले. तिथे तो एका खिडकीला गुलाबी रंगाच्या स्कार्फने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. सुमीतच्या वडिलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सुमीतला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी सुमीतचे वडील शरद तानबाजी कामटकर यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नेमके काय घडले ?
सुमीत हळदीचे कारण सांगून घरून निघून गेला होता. मात्र त्याने दुस-याच एका घरी गळफास घेतला. हळद कुणाची होती की केवळ हळदीचे कारण सांगून तो घरून निघाला? त्या घरी तो कशासाठी गेला होता? इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. तसेच त्याने गळफास का घेतला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्याचा मोबाईल फोन घटनास्थळी नसल्याची माहिती आहे. या प्रकरणी वणी पोलीस तपास करीत आहे.  

Comments are closed.