वणीत आणखी एक धाडसी घरफोडी, 3 लाखांच्या दागिन्यांसह रोख लंपास

काळे ले आऊट येथील घटना, कधी थांबणार वणीतील घरफोडींचे सत्र?

बहुगुणी डेस्क, वणी: चोरट्यांनी वणीत पुन्हा एक घरफोडी केली आहे. ब्राह्मणी रोडवरील काळे ले आऊटमध्ये रविवारी मध्यरात्री ही घरफोडी झाली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. यात चोरट्यांनी अडीच लाखांचे दागिने व 30 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. वणीत बंद घर म्हणजे घरफोडी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सध्या लग्नाच्या सिजन असल्याने अनेक लोक बाहेरगावी जातात. मात्र सातत्याने होणा-या घरफोडीमुळे वणीकरांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी शेख मोबीन शेख सलाम (50) यांचे वरोरा रोडवर गॅरेज असून ते वणीतील ब्राह्मणी रोडवरील काळे ले आऊट येथे कुटुंबीयांसह राहतात. रविवारी यवतमाळ येथील त्यांच्या नातेवाईकाकडे लग्न होते. त्यामुळे ते कुटुंबासह यवतमाळ येथे लग्नासाठी गेले होते. रविवारी रात्री ते घरी परतणार होते. मात्र नातेवाईकांच्या आग्रहास्तव ते यवतमाळ येथेच थांबले. सकाळी 6 वाजता ते यवतमाळहून वणीसाठी निघाले.

घरी परत आल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण त्यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडलेले होते. तसेच दरवाज्याचा कोंडा काढलेला होता. आलमारी फोडलेली होती. तर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू केल्या असता त्यांना तीन तोळ्याचा सोन्याचा हार, अर्धा तोळे कानातील रिंग, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी, चांदीचे चाळ व चैन असा सुमारे अडीच लाखांचे दागिने लंपास झालेले आढळले. तसेच घरी आलमारीत ठेवलेली 30 हजारांची रोख रकमेवर देखील चोरट्यांनी डल्ला मारला. 

मोबीन यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 331 (4) व 305 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घरफोडीमुळे वणीकर दहशतीत !
सध्या लग्नाचा सिजन आहे. तसेच मुलांच्या शाळेला देखील सुट्टी लागल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक बाहेरगावी जातात. असे घर चोरट्यांच्या रडारवर आहेत. सध्या जे घर बंद असते ते घर फुटलेच असे एक समीकरण झाले आहे. आयुष्यभराची जमापुंजी चोरटे एका रात्रीत लंपास करीत आहे. घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लागत नसल्याने सध्या नागरिकांनीच सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. पोलीस प्रशासनाने देखील बाहेरगावी जात असल्याची याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन केले आहे. सातत्याने होणा-या घरफोडीमुळे वणीकर चांगलेच दहशतीत आले आहे. 

रात्री हळदीला जातो सांगून घरून निघाला, पहाटे आढळला मृत….

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.