बहुगुणी डेस्क, वणी: पत्नी सोडून गेल्याबाबत थट्टा मस्करी करणे, टोमणे मारणे हे दोन कुटुंबामध्ये हाणामारीचे कारण ठरले. दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. वणीतील गोकुळ नगर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका पानटपरीवर ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांविरोधात तक्रार दिली असून एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नरेश बंडूजी घोगरे यांच्या तक्रारीनुसार, नरेश (34) हा गोकुळनगर वणी येथील रहिवासी असून तो मजुरी काम करतो. तो त्याचा मुलगा व आईसह गोकुळनगरमध्येच राहतो. तर त्याची पत्नी दोन महिन्यापूर्वी माहेरी गेली आहे. त्याच्या शेजारी त्याचा साडू किशोर मोरे हा त्याच्या कुटुंबीयांसह राहतो. मात्र नातेवाईक असले तरी या दोन कुटुंबात वाद आहे. त्यामुळे या दोन कुटुंबात बोलचाल नाही. बुधवारी दिनांक 11 जून रोजी नरेश जेवण झाल्यानंतर वार्डातीलच एका पानटपरीवर गेला. दरम्यान तिथे आरोपी किशोर मोरे हा कॅरम खेळत होता.
किशोर तिथे शिवराळ भाषेत बायको पोसता येत नाही अशा आषयाचे टोमणे दुस-या एका व्यक्तीजवळ मारीत होता. नरेशची पत्नी सोडून गेल्याने किशोर हा त्यालाच टोमणे मारतोय याची त्याला खात्री झाली. त्यामुळे किशोर बायकोवरून टोमणे का मारतोय, अशी विचारणा करण्यास नरेशजवळ गेला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाऊन किशोरने नरेशला लाथ मारून खाली पाडले. मारहाण सुरु होताच तिथे किशोरची पत्नी जमुना, किशोरचा भाऊ आणि आणखी एक इसम आला. त्यांनी देखील नरेशला मारहाण केली. किशोरने एका धारदार शस्त्राने नरेशवर हल्ला केला. यात त्याच्या हाताला जखम झाली.
किशोरची पत्नी जमुनाच्या तक्रारीनुसार, नरेश घोगरे हा जमुनाच्या बहिणीचा पती आहे. नरेश हा पत्नीला मारझोड करीत असल्याने दीड-दोन महिन्यापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली. घटनेच्या दिवशी जेवणानंतर किशोर हा पानटपरीवर खर्रा घेण्यासाठी गेला. तिथे तो इतरांसोबत गप्पा टप्पा करीत होता. पानटपरीवर असलेल्या एका व्यक्तीजवळ तो पत्नीवरून मस्करी करीत होता. मात्र नरेशने ही मस्करी स्वत:वर घेतली. बायकोवरून टोमणे का मारतोय, असे म्हणत नरेश किशोरजवळ शिविगाळ करीत आला. त्याने बाजूला पडलेली काठी उचलली व किशोरला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत आणखी घोगरे कुटुंबातील आणखी दोन व्यक्ती सामिल झालेत.
नव-याला मारहाण होताना पाहून किशोरची पत्नी मध्ये पडली. तर नरेशने तिला देखील मारहाण केली व एका धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. यात तिच्या चेह-यावर जखम झाली. दोन नातेवाईक असलेल्या कुटुंबांमध्ये होणारी हाणामारी पाहून पानटपरी व वार्डातील काही लोक मध्ये आले. त्यांनी ही हाणामारी सोडवली.
दोन्ही कुटुंबातर्फे एकमेकांविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नरेशच्या तक्रारीवरून किशोर, त्याची पत्नी जमुना व एक सहकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जमुना यांच्या तक्रारीवरून नरेश घोगरे व दोन सहका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
RN सोलर सिस्टीमचे गोडावून स्थानांतरण, आता हनुमान मंदिराजवळ जैन ले आउट येथे साधा संपर्क



Comments are closed.