बहुगुणी डेस्क, वणी: एकेकाळी कापसाची राजधानी म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख होती. आता तो शेतकरी आत्महत्यांसाठी कुख्यात झाला आहे. वणी, मारेगाव, झरी परिसरांतील निरंतर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय झाला आहे. जुन्या बातमीची शाई वाळते न् वाळते तोच नव्या आत्महत्येची बातमी समोर येते. मारेगाव तालुक्यातील साखरा गावातही तोच प्रकार घडला. येथील एका 40 वर्षीय शेतकऱ्यांनं गावठाण शिवारातल्या पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दिनांक 27 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
बबन जोगिराम परचाके (40) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बबन हे स्वत:ची व सोबतीला मक्त्याची शेती करत. त्यावर त्यांच्या संसाराचा गाडा चालत होता. मात्र यावर्षी पावसानं चांगलाच फटका बसला. त्यांना दुबार पेरणी करावी लागली. आधीचे खर्च व परिश्रम वाया गेलेत. पुढं काय होईल याच विवंचनेत ते असायचे. अखेर त्यांचा संयम सुटला व त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. नायलोन दोराच्या साह्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
बबन परचाके यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला. बबन परचाके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. आत्महत्येचा पुढील तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांचे मार्गदर्शनात दत्ता किनाके करीत आहे.
Comments are closed.