बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील कुंभारखनी येथील 28 वर्षीय आरती जय बुरचुंडे या विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दिनांक 19 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. सहा महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. वैवाहिक जीवनातील मतभेदांमुळे गेल्या दोन महिन्यांपासून ती मुकुटबन रोडवरील साईलीला नगरी, येथे तिच्या मोठ्या बहिणीकडे राहत होती. तिथेच तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
प्राथमिक माहितीनुसार, आरती यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी वरोरा येथील आनंदवन येथे राहणाऱ्या जय बुरचुंडे यांच्याशी झाला होता. जय हा वेकोलिच्या कोलारपिंपरी कोळसाखाणीत कार्यरत आहे. लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले, ज्यामुळे आरती यांनी पतीचे घर सोडले ती माहेरी आली. नंतर तिने स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षणासाठी बहिणीकडे राहायला गेली. तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती, शिकवणी वर्ग लावले. एका खाजगी शैक्षणिक संस्थेत प्रवेशही घेतला होता.
18 जुलैच्या रात्री साईलीला नगरीमध्ये बहिणीच्या घरी सर्व कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. घरातील सर्व मंडळी झोपण्यासाठी गेले. मात्र, 19 जुलैला सकाळी उशीर झाला तरी आरती उठली नाही. बहिणीने त्यांच्या खोलीत पाहिले असता ती तिथे नव्हती. बराच वेळ ती न दिसल्यामुळे तिची बहिण वरच्या माळ्यावरील बेडरूममध्ये गेली. तिथे आरती पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. बहिणीने किंचाळी फोडली आणि कुटुंबीयांना माहिती दिली. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना सूचना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आरतीने नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कुटुंबावर आणि परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या आरती यांनी असा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.





Comments are closed.