बहुगुणी डेस्क,वणी: वणी तालुक्यातील सावंगी शिवारात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकाम स्थळावरून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी सळई आणि पाइप असा अंदाजे 20,000 रुपये किमतीचा माल चोरून नेला. ही चोरी 2 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. याबाबत कंत्राटदार यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे.
तक्रारीनुसार, कुंडलीक मनीराम ठावरी (वय 57, रा. सदाशिव नगर) हे शासकीय कंत्राटदार आहे. त्यांच्याकडे सावंगी येथील पुलाचे काम आहे. गेल्या 6 महिन्यांपासून सावंगी शिवारात हे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी लागणारे लोखंडी सळई आणि दोन इंची लोखंडी पाइप बांधकाम स्थळावर ठेवले होते. या साहित्याच्या देखभालीसाठी त्यांनी 5 महिन्यांपासून चौकीदार नेमला होता.
3 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ठावरी हे बांधकाम स्थळावर गेले असता, तिथे चौकीदार आढळला नाही. साहित्याची पाहणी केली असता, अंदाजे 20,000 रुपये किमतीच्या लोखंडी सळई आणि पाइप गायब असल्याचे निदर्शनास आले. ठावरी यांनी चौकीदारास याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि साहित्य कोणी नेले याची माहिती नसल्याचे सांगितले. काही वेळाने चौकीदार कामाच्या ठिकाणावरून निघून गेला.
या घटनेनंतर कुंडलीक ठावरी यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला जाऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



Comments are closed.