वेगाव येथे तरुणाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

एका 23 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यात एका तरुणाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी (दि. 16 ऑगस्ट) रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. मात्र संध्याकाळच्या सुमारास तरुणाचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव राहुल शंकर मेश्राम (वय 23) असे आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  

प्राप्त माहितीनुसार, राहुल हा वेगाव येथील राहत होता. तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. शनिवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी घरी कुणी नसताना राहुलने घरात कीटकनाशक प्राशन केले. काही वेळात त्याच्या कुटुंबीयांना राहुलने विष प्राशन केल्याचे लक्षात आले. त्यामुळे राहुलला कुटुंबीयांनी तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर येथे रेफर केले.

चंद्रपूरकडे नेत असताना वाटेतच राहुलची हालचाल थांबली. त्यामुळे राहुलला पुन्हा मारेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे वेगाव गावात शोककळा पसरली असून, नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे. राहुलने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किसन संकुरवार तपास करीत आहेत.

Comments are closed.