चक्कीवर दळणासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग

महिला एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपीचे कृत्य

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील एका गावात शनिवारी (दि. 16 ऑगस्ट) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीठ गिरणीवर गेलेल्या 27 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला ही मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे.  शनिवारी सायंकाळी ती पीठ गिरणीवर दळण दळायला गेली होती. त्यावेळी 35 वर्षीय आरोपी रवींद्र बाबाराव कालेकर हा तिथे उपस्थित होता. गिरणी चालकाने जेवण करून येईपर्यंत रवींद्रला गिरणीकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. चालक गेल्यानंतर तिथे पीडित महिला एकटीच होती. रवींद्रने एकटी महिला बघून मागून जात तिच्यावर विनयभंगाचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला.

महिलेने सदर घटना घरी येऊन तिच्या पतीला सांगितली. त्यानंतर पती-पत्नीने रात्रीच मारेगाव पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी रवींद्र कालेकरविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.  

Comments are closed.