तब्बल 23 वर्षांनी वर्गमित्र पुन्हा एकत्र, शाळेत रंगला स्नेहसोहळा

जुन्या वर्गात त्याच बाकावर पुन्हा बसले विद्यार्थी, शिक्षकांनी घेतली हजेरी...

विवेक तोटेवार, वणी: बालपणीचा काळ, शाळा आणि मैत्री या तिन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेवा असतो. शाळेत शिकलेले धडे, खेळलेले खेळ, केलेल्या खोड्या, मिळालेली शिक्षा यामध्येच खरी बालपणाची मजा दडलेली असते. काळ पुढे सरकतो, जबाबदाऱ्या वाढतात, सर्व वर्ग मित्र मैत्रिणी आपापल्या आयुष्यात बिझी होतात. पण बालपणीच्या शाळेच्या आठवणी आणि मैत्रीचा सहवास हा हृदयाच्या एका कप्यात घर करून राहतो. “बालपणीची शाळा, वर्गातील किलबिलाट आणि सरांचा आवाज पुन्हा एकदा अनुभवावा…” या भावनेने वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयातील सन 2002-2003 च्या दहावी (क) वर्गातील विद्यार्थी तब्बल 23 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. 17 ऑगस्ट रोजी शाळेत भरलेल्या या स्नेहमिलन कार्यक्रमात सर्व विद्यार्थी एकत्र आलेत व त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांनी भूषविले. मुख्याध्यापक प्रमोद क्षिरसागर, आनंद शोभणे सर, सिंग मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वागत करताना माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती-जमतींच्या आठवणींना उजाळा दिला. 23 वर्षांपूर्वीच्या त्याच वर्गखोलीत एक दिवसाचा वर्ग सुरू करण्यात आला. त्याच बेंचवर, त्याच बेंच पार्टनरसोबत विद्यार्थी पुन्हा बसले. आनंद शोभणे सरांनी हजेरी घेतली आणि इंग्रजीचा तासही घेतला. वर्गातील किलबिलाट आणि सरांचा आवाज पुन्हा कानावर पडल्याने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला.

यावेळी माजी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुणी आपले बालपणीचे अनुभव कथन केले तर कुणी शाळेतील गमतीजमती शेअर केल्या. शाळेच्या पटांगणात जुने खेळ खेळण्याचा आनंद सर्वांनी लुटला. स्नेहभोजनाने या सोहळ्याला आणखी रंग चढला. जुन्या आठवणी, जुने मित्र आणि शाळेचं प्रेम यामुळे हा स्नेहमिलन सोहळा अविस्मरणीय ठरला. या अविस्मरणीय सोहळ्यासाठी महेश सोमलकर, शत्रूघ्न मालेकर, विशाल चंदनकर यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमात अमोल बल्की, सचिन सूर, श्याम गोवरदीपें, कुशल घुगे, भारत निखाडे, प्रवीण लाडे, श्रीकांत कालर, शैलेश वंजारी, किशोर ढेंगले, प्रतीक खैरे, निखिल रेड्डी, अमोल कुळमेथे, गणेश राजा यांच्यासह माजी विद्यार्थिनींमध्ये डॉ. कोमल मोरे, प्रिती निकुरे, डॉ. रचना वानखडे, वैशाली सोनेकर, विद्या गौरे, पल्लवी झाडे, जयश्री भोयर, मीनाक्षी रासेकर, तरुणा कालडा, माधुरी धोटे, भावना लोहोकरे, दीपाली कामरे, गिरिजा आत्राम, अंजली वनकर, अमृता महाकुलकर, रूपाली गोहोकार, पूनम रणदिवे, शुभांगी देरकर, आरती भगत, गौरी दुबे, सरिता गंधेवार, शुभांगी बोढे, मनीषा गेडाम आदींचा सहभाग होता.

Comments are closed.