रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या प्रश्नावर नगर पालिकेसमोर विराट आंदोलन

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मनसे शहर अध्यक्ष अंकुश बोढे यांचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात रस्त्यावर फिरणा-या मोकाट जनावरांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार निवेदनं दिलीत. मात्र पालिका प्रशासनाने याला केराची टोपली दाखवली. अखेर मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात आज गुरुवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी नगर पालिकेसमोर दु. 12 वाजता आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे. 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टागोर चौक, खाती चौक, तुटी कमान, गांधी चौक यासह अन्य वर्दळीच्या चौकांमध्ये आणि रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यवतमाळ व वरोराकडे जाणाऱ्या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांवर ही जनावरे बिनधास्तपणे फिरत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. दुचाकीस्वार अचानक समोर आलेल्या जनावरांना वाचवताना मोठ्या प्रमाणात अपघातांना बळी पडत आहेत. शहरातील रहिवाशांमध्ये विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे, कारण अनेकदा ही जनावरे एकमेकांशी भांडतात किंवा अचानक धावत अंगावर येतात.

मनसेचा लढा सुरु राहणार
शहरातील रस्त्यांवरून जनावरांना हटवून नागरिकांसाठी सुरक्षित आणि मोकळे रस्ते उपलब्ध करून देणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. गेल्या एक महिन्यात दोनदा पालिका प्रशासनाला निवेदन दिले. समस्या सुटण्यासाठी स्मरणपत्र दिले. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. वणीकरांच्या सुरक्षीततेबाबत कोणतीही तटजोड केली जाणार नाही. जोपर्यंत ही समस्या सुटत नाही. तो पर्यंत मनसेचा याविरोधात लढा सुरु राहणार.
-अंकुश बोढे, शहराध्यक्ष मनसे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असल्याने वाहतुकीला तर अडथळा होत आहे, सोबतच अनेक अपघातही होत आहे. अपघाताच्या व वाहतूक समस्येची वारंवार समस्या समोर येत असल्याने मनसेने अखेर पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.  

खळबळजनक: अवघ्या 50 रुपयांच्या जुगाराच्या वादातून गणेशपूरात खून

Comments are closed.