बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरालगत असलेल्या पटवारी कॉलनीत जुन्या वादातून एका युवकाला बेदम मारहाण करून चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या घरमालकालाही चाकूने भोसकले. ही घटना गुरुवारी दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशांत गिरीधर पुसाम (32) हे पटवारी कॉलनीत राहुल पितांबर सातघरे यांच्या घरी किरायाने राहतात. ते ट्रक चालक म्हणून काम करत असून, मूळचे वणी तालुक्यातील बोरगावचे रहिवासी आहेत. त्यांच्या शेजारी राहणारा जीवन भिमराव सातघरे (32) यांच्याशी घरमालक राहुलशी पटत नाही. त्यांच्यातील वाद हा एकमेकांविरोधात तक्रार देण्यापर्यंत देखील पोहोचला होता. राहुल सातघरे यांनी एक ते दीड वर्षांपूर्वी आरोपी विरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली होती.
21 ऑगस्टला प्रशांत पुसाम हे नेहमी प्रमाणे कोळसाखाणीत ट्रक चालवण्यास गेले होते. ड्युटी संपल्यानंतर त्यांनी ब्राह्मणी फाट्याजवळ ट्रक लावला व ते घरी परत येत होते. त्याचवेळी जिवन सातघरे याने त्यांना रस्त्यात गाठले आणि त्यांच्या तसेच त्यांच्या घरमालकाच्या मुलांना मारण्याची धमकी दिली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद हातापायी पर्यंत पोहोचला. त्यानंतर आरोपी जीवन हा घटनास्थळावरून निघून गेला. मात्र, काही वेळाने तो पुन्हा प्रशांत यांच्या घरी आला आणि जोरदार शिवीगाळ करू लागला.
घरमालकांनी येऊन समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु जीवनने ऐकण्यास नकार दिला. त्याने स्वतःजवळील चाकूने थेट प्रशांत पुसाम यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या हाताच्या दंडावर, हनुवटीखाली आणि पायांच्या टोंगल्याजवळ चाकूने वार केले, ज्यामुळे प्रशांत गंभीर जखमी झाले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या घरमालकाच्या हातावरही चाकूने वार करून त्यांना जखमी केले. हल्ल्यानंतर जीवनने जीवे मारण्याची धमकी दिली व तो तिथून पसार झाला.
जखमी झालेल्या प्रशांत पुसाम यांनी तात्काळ वणी पोलिस स्टेशन गाठून जिवन सातघरे याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जिवन सातघरे याच्यावर बीएनएसच्या कलम 115(2), 118(1), 351(2), 351(3), 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेने पटवारी कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



Comments are closed.