बहुगुणी डेस्क, वणी: भगवान श्रीकृष्णाच्या जयघोषाने रविवारी वणी शहर दुमदुमले. जय श्रीकृष्णजन्माष्टमी समितीतर्फे आयोजित शोभायात्रेने नगरीत भक्तीमय वातावरण निर्माण केले. “हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की…” या घोषणांनी परिसर गुंजून गेला. अॅड. कुणाल चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी अमृत भवन परिसरातून शोभायात्रेला प्रारंभ झाला, ज्याचे पूजनाने स्वागत झाले.
दुर्ग येथील बेंजो धुमाल पार्टी, राधेसह श्रीकृष्णाची मूर्ती, बैतुल येथील महाकाली कलापथक, प्रभू श्रीराम, परशुराम, बालाजी, खाटुश्याम बाबा, गजानन महाराज शेगावसह पाच भजन मंडळी, पाच डीजे, घोड्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक सांस्कृतिक विषयांवरील २२ देखाव्यांनी शोभायात्रेला भव्यता प्राप्त झाली. लेझीम पथक, गोंडी नृत्य आणि सजीव देखाव्यांनी रंगत वाढवली. ढोलताशा पथकाच्या जोरदार वादनाने आसमंत दणाणला, तर ध्वजधारकांनी टाळ आणि ढोलवर ठेका धरला. शोभायात्रा इंदिरा चौक, खाती चौक, गांधी चौक, टागोर चौक, शिवाजी चौकमार्गे अमृत भवनात आनंदोत्सवात समारोपाला पोहोचली.
हजारो भाविकांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला. श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशातील चिमुकले, गोंडी ढेमसा नृत्य आणि ढोलपथकाचे वादन यांचे मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडिओ टिपण्यासाठी प्रेक्षकांची लगबग होती. वणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अॅड. कुणाल चोरडिया यांनी सर्वांचे आभार मानले. या शोभायात्रेने वणीतील जन्माष्टमी उत्सवाला नवीन उंचीवर नेले.


Comments are closed.