अखेर टिळक पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटवले

युवासेनेच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल

विवेक तोटेवार, वणी: गेल्या काही वर्षांपासून वणी येथील टिळक पुतळ्यासमोर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे पुतळा दिसेनासा झाला होता. याबाबत युवासेनेच्या वतीने 29 ऑगस्ट रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेत शनिवारी सकाळी कारवाई करून पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटवले. तसेच यापुढे अतिक्रमण न करण्याबाबत दुकानदारांना सूचना प्रशासनाने केली आहे.

युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी निवेदनात सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांनी संयुक्त कारवाई करत टिळक पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढून परिसर मोकळा केला. तसेच, अतिक्रमण करणाऱ्यांना पुन्हा अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी युवासेनेचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.