वंचितचा बुलंद आवाज… मारेगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

संघटीत लढ्यानेच परिवर्तन शक्य, राजू निमसटकर यांची गर्जना

बहुगुणी डेस्क, वणी: दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी बुधवारी मारेगाव येथील बदकी भवन सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसह नव्या दमाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मेळाव्याचे नेतृत्व राजू निमसटकर यांनी केले. जुलमी मनुवादी व्यवस्थेविरुद्ध लढायचे असेल तर वंचित हाच एकमेव पर्याय आहे, अशी गर्जना यावेळी राजू निमसटकर यांनी केली.

या मेळाव्यात लोकशाही पद्धतीने मारेगाव तालुका ग्रामीण व मारेगाव शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. पुरुष व महिला कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. मारेगाव तालुका ग्रामीणच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मून, तर कार्याध्यक्षपदी गौतम पांडुरंगजी दारुंडे, मारेगाव तालुका ग्रामीणच्या (महिला) अध्यक्षपदी अभिषा राजेंद्र निमसटकर तर कार्याध्यक्षपदी शोभा चंदनखेडे मारेगाव शहर अध्यक्षपदी अध्यक्ष अनंता खाडे तर कार्याध्यक्षपदी रवी तेलंग व मारेगाव शहर (महिला) अध्यक्षपदी रेखा काटकर, तर कार्याध्यक्षपदी शोभा दारुंडे यांनी नियुक्ती करण्यात आली. मेळाव्यात प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संघटीत लढ्यानेच परिवर्तन शक्य – राजू निमसटकर
वंचित बहुजन आघाडी ही वंचित, शोषित, पीडित, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी आणि बहुजन समाजाच्या न्यायहक्कासाठी लढणारी एकमात्र राजकीय संघटना आहे. श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना सामाजिक परिवर्तनासाठी कटिबद्ध असून, बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने संघटीतपणे पुढे यावे, ही काळाची गरज आहे. आज देशात आणि राज्यात प्रस्थापित व्यवस्थेने बहुजन समाजाला दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. संघटीत लढा म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर सामाजिक जागृतीचा आणि परिवर्तनाचा मार्ग आहे. म्हणूनच, प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीमध्ये वंचितचा आवाज बुलंद होणे गरजेचे आहे. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य गौतमजी मालखेडे यांनी केले, तर नवनियुक्त तालुकाध्यक्ष ग्रामीण ज्ञानेश्वर मुन यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वासू वनकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यकर्त्यांच्या एकतेने आणि नव्या नेतृत्वाच्या जोमाने वंचित बहुजन आघाडीचा लढा अधिक प्रभावी होईल, असा विश्वास या मेळाव्याने जनतेमध्ये निर्माण केला आहे. येत्या काही दिवसांत नवनियुक्त कार्यकारिणीला अधिक व्यापक रूप दिले जाईल आणि पदग्रहण व पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली. 

Comments are closed.