बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा रोडवर गायींच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. बजरंग दलाच्या तत्पर कारवाईने वणी परिसरातील जनावरांच्या क्रूर वाहतुकीचा पर्दाफाश झाला. एका मालवाहू वाहनातून 5 गायी व गोऱ्यांची क्रूरपणे वाहतूक सुरु होती. रविवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास धाड टाकण्यात आली. दरम्यान एक संशयित फरार झाला. तर दोघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत 6 जनावरांची सुटका करण्यात आली. आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मंगळवार, 15 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता बजरंग दलाचा कार्यकर्ता समीर सुधाकर पवार (वय 23, रा. शास्त्रीनगर, वणी) यांना तालुका अध्यक्ष रोहन पारखी यांचा कॉल आला. पारखी यांनी सांगितले की नांदेपेरा रोडवर जनावरांनी भरलेली गाडी येणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर समीर पवार, सुमित निलावार, संकेत हांडे, वैभव नक्षिणे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान रात्री 8.30 वाजताच्या सुमारास नांदेपेरा रोडवरील मजरा येथे टाटा वाहन (क्र. MH-29-BE-6904) हे वाहून वणीच्या दिशेने येत होते. कार्यकर्त्यांनी थांबवून पाहणी केली असता, त्यात 5 गायी आणि 1 गोरा हे दोन्ही पायांना दोरीने बांधून, कमी जागेत क्रूर पद्धतीने कोंबलेले आढळले. यावेळी गाडीचा चालक शेख रिजवान शेख शकील (रा. इस्लामपूरा वॉर्ड, जत्रा मैदान, वणी) आणि अकबर खान अमिर खान पठाण (रा. जत्रा मैदान, वणी) हे गाडीत उपस्थित होते. तर कार्यकर्त्यांनी गाडी थांबवताच तिसरी व्यक्ती पळून गेली.
कार्यकर्त्यांनी तिस-या व्यक्तीबाबत माहिती विचारली असता त्या दोघांनी सदर व्यक्ती ही नांदेपेरा येथील ‘झाडे’ आडनाव असलेली असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी तिन्ही संशयीतांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11(1)(d), 11(1)(e), 11(1)(f) आणि महाराष्ट्र पशू संरक्षक कायद्याच्या कलम 11, 5, 5(a), 5(b), 9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.





Comments are closed.