हा केवळ आक्रोश नव्हे, तर निष्ठा आणि संघर्षाची साक्ष !
मारेगावातील ‘महाआक्रोश मोर्चा’ ठरला अभूतपूर्व; पावसातही विक्रमी उपस्थिती
बहुगुणी डेस्क, वणी : मारेगाव तालुक्यात गुरुवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त मोर्चा व मेळावा आयोजित करण्यात आला. ‘कार्यकर्ता मेळावा आणि आक्रोश मोर्चा’ केवळ यशस्वीच नव्हे, तर ऐतिहासिक ठरला. अविरत पावसाच्या तडाख्यातही हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि वंचित, शोषित, आदिवासी समाजावरील अन्यायाविरुद्ध एकजुटीचा एल्गार पुकारला. कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी राजू निमसटकर यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली.

या आंदोलनात युवा कार्यकर्त्यांसह महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती. पावसाची रिपरिप सुरू असतानाही सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गाव सोडून मारेगावच्या रस्त्यावर उतरून संघर्षाची तयारी आणि विचारांवरील निष्ठा सिद्ध केली. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, समाज संघटित करण्याचा आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याचा उद्देश या आंदोलनामागे होता.

मेळाव्यानंतर निघालेल्या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे, वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर, शिवदास कांबळे, करुणाताई मून, मिलिंद पाटील आणि इतर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले.
हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत मोर्चा मारेगाव तहसील कार्यालयावर धडकला आणि प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात महाबोधी महाविहार तात्काळ बौद्ध समाजाच्या ताब्यात देणे, शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करून सातबारा कोरा करणे, आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

कार्यक्रमात डॉ. नीरज वाघमारे यांनी राजू निमसटकर यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आणि भाषणातून अधिकृत घोषणा केली. आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये वाघमारे, निमसटकर यांच्यासह शिवदास कांबळे, करुणाताई मून, सविता तिडके, मिलिंद पाटील, संतोष राऊत, मंगल तेलंग, नंदिनी ठमके, शारदा मेश्राम यांचा समावेश होता.

यासोबतच ज्ञानेश्वर मून, अनिल खैरे, अनंता खाडे, रवी तेलंग, सुरेखा काटकर, शोभा दारुंडे, शितल तेलंग, अभिषा निमसटकर, यशोधरा चंदनखेडे, विनेश मेश्राम, संजय जीवने आदींसह हजारो निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या कार्यकर्त्यांची अथक मेहनत आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मोलाची ठरली.



Comments are closed.