“लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधानाची जाणीव आवश्यक – अ‍ॅड. असीम सरोदे”

बळीराजा व्याख्यानमालेत लोकशाही, देशभक्ती आणि विवेकशीरतेवर भाष्य

बहुगुणी डेस्क, वणी: वणीच्या बाजोरिया लॉनवर शनिवारी संध्याकाळी बौद्धिक मेळावा रंगला होता. शिव महोत्सव समितीच्या वतीने आयोजित बळीराजा व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी संविधान विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर सामान्य नागरिकांना ताकद देणारे साधन आहे. “सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो वापरला नाही, तर लोकशाही कशी टिकणार?” असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांवर टीकात्मक विश्लेषण करण्याचा आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा अधिकार व आत्मविश्वास हा सामान्य नागरिकांना संविधानाने दिला आहे. त्या अधिकाराचा वापर करून आपण लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन संविधान विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.

शिव महोत्सव समिती, वणी यांच्या वतीने आयोजित बळीराजा व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी “संविधानातील कर्तव्यांची जाणीव आणि विवेकशीरता” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समितीचे अध्यक्ष अनंत मांडवकर यांनी भूषवले.

सरोदे म्हणाले की, “भारतीय संविधान हे बदल्याच्या भावनेतून नव्हे तर सर्व नागरिकांना उपकारक ठरेल या पद्धतीने रचले गेले आहे. मात्र आज संविधानाची जाणीव निर्माण करण्याऐवजी केवळ पाठांतराचे संस्कार होत आहेत. त्यामुळे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक झेपेला आपण न्याय देऊ शकलो नाही.”

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

देशभक्तीच्या बदललेल्या संकल्पनेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “भारतावर प्रेम करणे म्हणजे पाकिस्तानला शिव्या देणे किंवा मुस्लिमांवर द्वेष करणे असा चुकीचा सिद्धांत तयार झाला आहे. खरी देशभक्ती म्हणजे नागरिकांच्या हक्कांचे रक्षण आणि लोकशाहीचे संवर्धन होय.”

महाराष्ट्रात पारित झालेला जन सुरक्षा कायदा हा सत्ताधाऱ्यांच्या मानसिक भीतीचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “कायदे हे लोकांसाठी आहेत, त्यामुळे राज्यकर्त्यांनी लोकहिताचेच कायदे करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

धर्मांधतेवर टीका करताना सरोदे यांनी सांगितले की, “देव आणि धर्म घरापुरते मर्यादित ठेवले पाहिजेत. घराबाहेर आपण सर्वप्रथम भारतीय नागरिक आहोत ही जाणीव सतत बाळगली पाहिजे.”

व्याख्यानाचा समारोप करताना त्यांनी शिवस्मारक, भावनिक राजकारण, पर्यावरण आणि भांडवलशाही यांसारख्या विषयांवरही भाष्य केले. “लोकशाही मान्य नसलेले हुकूमशहा सत्तेवर आहेत, त्यामुळे लोकशाही टिकवणे हे आपले कर्तव्य आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन गाडे, मराठा सेवा संघाचे अंबादास वागदरकर, डॉ. सुनिल जुमनाके, पत्रकार नितीन पखाले, अ‍ॅड. परवेज पठाण, वंदना विधाते-धांडे, भारती राजपुत, गजानन चंदावार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास शेरकी यांनी केले. सूत्रसंचालन कृष्णदेव विधाते यांनी केले तर आभार अजय धोबे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुरेंद्र घागे, वसंत थेटे, राजेश्वर कुचनकार, मारोती जिवतोडे, संदीप ठाकरे, विजय दोडके आदींनी परिश्रम घेतले.

Comments are closed.