खंडणी गावात सर्पदंशाची धक्कादायक घटना

अडीच वर्षीय चिमुरडीचा करुण अंत

विवेक तोटेवार , वणी: शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी मारेगाव तालुक्यातील खंडणी गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अवघ्या अडीच वर्षीय स्नेहा दशरथ मडावी या चिमुरडीचा विषारी सापाच्या दंशाने दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ आणि दुख: व्यक्त होत आहे. 

स्नेहा तिच्या आजीसोबत दिवसभर घराजवळ खेळत होती. सायंकाळी आजी पीठ दळण्यासाठी गिरणीवर निघाली, तेव्हा चिमुरडीनेही हट्ट करत सोबत जाण्याचा आग्रह धरला. गिरणीवर पोहोचल्यानंतर आजी दळणाच्या कामात व्यस्त असताना, स्नेहा आजूबाजूला खेळत होती. याचवेळी, एका विषारी सापाने तिच्यावर अचानक हल्ला करत दंश केला.

घटनेनंतर स्नेहाला तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केलं. विषारी सापाच्या दंशाने अवघ्या काही क्षणांतच या नन्ह्या जीवाचा अंत झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या घटनेने खंडणी गावात शोकमय वातावरण पसरलं आहे. स्नेहाच्या निधनाने मडावी कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. स्थानिकांनी सर्पदंशाच्या घटनांवर नियंत्रणासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच, पावसाळ्याच्या काळात सापांचा धोका वाढल्याने नागरिकांना सावध राहण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Comments are closed.