नगरपरिषद निवडणुकीत नवे नेतृत्व उभारण्याची आदिवासी समाजाची तयारी
स्वबळावर उमेदवारीचा निर्धार; युवांचा नेतृत्वाकडे कल
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी रेस्ट हाऊस येथे आदिवासी समाजाची एक महत्वाची सभा पार पडली. या सभेत शहरातील आदिवासी चळवळीतील तरुण आदिवासींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. युवा आदिवासी वर्गाने ‘स्वबळावर राजकीय अस्तित्व निर्माण करून वणी शहराच्या विकासासाठी कार्य करायचे’ असा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त केला.
वणी शहरातील आदिवासी समाजाने आजच्या राजकीय परिदृश्यात स्वबळावर उभे राहण्याचा आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी वणी रेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या या सभेत आदिवासी युवकांनी एकमुखाने निर्णय घेतला की आता वेळ आली आहे ती स्वतंत्रपणे कार्य करण्याची आणि वणी शहराच्या विकासासाठी स्वनिर्णय घेण्याची.
सभेत बोलताना अनेक युवा कार्यकर्त्यांनी सांगितले की, “आदिवासी समाज हा नेहमीच राजकीय पक्षांना जोडलेला राहिला, मात्र आता आपण स्वतःचे नेतृत्व उभे करून जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात.”
या युवकांच्या मताला समर्थन देत वणी शहर आणि तालुक्यातील बहुजन चळवळीत सक्रिय असलेल्या आदिवासी कार्यकर्त्यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला. आदिवासी संघटनांमधील वैचारिक कार्यकर्त्यांनीही युवांच्या भूमिकेचे स्वागत केले आणि पुढील निवडणुकीत एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पद एसटी (महिला) राखीव आल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. सभेच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे पुढील रणनीतीसाठी पुन्हा बैठक आयोजित करण्याचे ठरवले.



Comments are closed.