नागपूर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वणीतील शेतकरी आक्रमक; जेलभरो धमकी
उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन; वकील संघाचा पाठिंबा
बहुगुणी डेस्क, वणी: शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या जोरदार आंदोलनाला वणी तालुक्यातील शेतकरी व विविध शेतकरी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास वणीतील हजारो शेतकरी जेलभरो आंदोलन करतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला. यासोबतच वणी वकील संघानेही या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्रातील सध्याच्या महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा ‘सातबारा कोरा’ (पूर्ण कर्जमाफी) करण्याचे आश्वासन देऊन मते मागितली, मात्र सत्तेत येऊनही हा शब्द पाळला गेला नाही. याचा तीव्र निषेध करताना निवेदनात म्हटले आहे की, फडणवीस सरकारच्या या उपेक्षेमुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे. अतिवृष्टी व दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले असताना भरीव मदतऐवजी तुटपुंज्या मदतीने शेतकऱ्यांचा अपमान केला जात आहे. लागवडीचा खर्चही निघणार नाही, अशी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.
शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापूस घरी पोहोचले असले तरी सरकारी खरेदी केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. शेतमालाच्या भावांबाबतही स्पष्ट घोषणा झालेल्या नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना तोट्याच्या भावात विक्री करावी लागत आहे. महाराष्ट्र व केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी धुळीस मिटवल्या असून, शेतमालाला उत्पादन खर्चासह ५० टक्के नफा देण्यात अपयशी ठरले आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि या वाढत्या आत्महत्यांसाठी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे सातबारा कोरा व शेतमालाला योग्य भाव न दिल्यास सरकारची सत्ता हरण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
निवेदनात शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत: शेतमालाला हमीभाव द्या, हमीभाव कायदा लागू करा, शेतकऱ्यांचे संपूर्ण सरसकट कर्ज माफ करा, एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या, खरीप हंगामासाठी विनाशर्त कर्ज उपलब्ध करा. नागपूर आंदोलनाच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन होईल आणि वणीतील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना मधुकर लांडे, किसान सभेचे कॉ. मनोज काळे, कॉ. अॅड. दिलीप परचाके, कॉ. अॅड. कुमार मोहरमपुरी, अजय धोबे, लक्ष्मण देठे, गजानन राजुरकर, कुंदन टोंगे, गीत घोष, पुंडलिक पिंपळशेंडे, संजय गोहोकर, किसन राजुरकर, सतीश भटगरे, सेनापती पावडे उपस्थित होते. वणी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विरेंद्र महाजन, सचिव अॅड. अमोल टांगे, अॅड. शेखर वऱ्हाटे, अॅड. विप्लव तेलतुंबडे, अॅड. अमन शेख यांनीही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.



Comments are closed.