अखेर रात्री चिमुकल्या इनायाची देखील प्राणज्योत मालवली
अपघातातील 5 वा बळी, रात्री उशीरा अंत्यसंस्कार
विवेक तोटेवार, वणी : वणी-घुग्घुस रोडवरील जन्नत हॉटेलजवळ शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात वणीतील एका कुटुंबावर अपरिमित दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघातात कारमधील तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्यांचे वडील रियाजुद्दीन शेख यांनीही आपल्या मुलींच्या निधनाच्या धक्क्याने प्राण सोडले. तर गंभीर जखमी असलेली चिमुकली इनाया हिचा उपचारादरम्यान शनिवारी (1 नोव्हेंबर) रात्री 7.30 वाजता मृत्यू झाला.
शुक्रवारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेली इनाया हिला सुरवातीला उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर तब्बेत गंभीर असल्याने तिला नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण ती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तिला पुन्हा वणीला आणण्यात आले. वणीतील एका खाजगी रुग्णालयात शनिवारी तिचा उपचार सुरू होता. परंतु तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ती हालचाल करीत नवती. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिला ठेवण्यात आले. परंतु काहीच प्रतिसाद देत नसल्याने तिला सायंकाळी 6.30 वाजता घरी पाठविण्यात आले. त्यानंतर 7.30 वाजता तिचे अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी यांनी तिला मृत घोषित केले.
प्राप्त माहितीनुसार, रियाजुद्दीन शेख (वय 55) हे वणीच्या भीमनगर येथील रहिवासी होते. त्यांचे लाल पुलिया परिसरात गॅरेज होते. त्यांना 4 मुली आहेत. रियाजुद्दीन मोठी मुलगी लायबा बी.कॉमचे शिक्षण घेत असून, मायरा बारावीत (विज्ञान शाखा), झोया आठवीत आणि अनिबा सहावीत लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. सध्या मुलींना सुटी असल्याने ते त्यांच्या मुलीला कार चालविण्याचे प्रशिक्षण देत होते. शुक्रवारी सकाळी घुग्घुस रोडवर स्कोडा (क्र. MH01 AH 5700) कार घेऊन गेले होते. त्यांच्यासोबत तीन मुली — मायरा, झोया, अनिबा — आणि भावाची मुलगी इनाया होती. मायरा ही कार ड्राईव्ह करत होती.
दरम्यान, ब्राह्मणी ते लालगुडा दरम्यान मायरा (17) कार चालवत असताना ती ओव्हरटेक करीत होते. दरम्यान कारवरील नियंत्रण सुटले. कार दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला.
मुलीच्या निधनाची वार्ता ऐकून वडिलांनी सोडले प्राण
या अपघातात मायरा (17), झोया (13) आणि अनिबा (11) या तिघींचा जागीच मृत्यू झाला. तर रियाजुद्दीन यांना गंभीर दुखापत झाली होती. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र मुलींच्या निधनाची बातमी समजताच रियाजुद्दीन यांनीही प्राण सोडले.
भावाची चार वर्षांची मुलगी इनाया गंभीर जखमी अवस्थेत होती. सुरुवातीला तिला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले, नंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. परंतु शनिवारी रात्री इनायानेही अखेरचा श्वास घेतला.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण वणी शहर शोकाकुल झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी वणीतील कब्रस्तानात रियाजुद्दीन आणि त्यांच्या तीन मुलींचा दफनविधी पार पडला. या अपघाताने संपूर्ण वणी हादरली असून, शेख परिवारावरील या दु:खद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



Comments are closed.